न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भारतीय अमेरिकी कमला हॅरिस यांनी केली आहे. दुसरीकडे अमेरिकन काँग्रेसमधील पहिल्या हिंदू महिला तुलसी गबार्ड या देखील राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचं कळतं आहे. देशातील १२ डेमोक्रेटीक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी तयारी केली आहे. अमेरिकेत तुलसी गबार्ड आणि कमला हॅरीस हे दोघेही फार लोकप्रिय आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या या निवडणुकीत थेट सामना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच होणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल कमला हॅरिस यांनी अमेरिकेची सीनेट सीट जिंकत याआधी इतिहास रचला होता. इतकं मोठं यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी ठरल्या होत्या. डेमोक्रेट लॉरेटा सानचेज यांचा पराभव करत 51 वर्षीय हॅरिस या अमेरिकेच्या सीनेटपदी निवडून आल्या होत्या. मागील २ दशकांपासून अधिक वेळ उच्च सदनात पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. त्यांची आई श्यामला गोपालन चेन्नईहून येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. त्यांचे वडील जमैकामध्ये शिकले. कमला यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. 2 वेळा अटॉर्नी जनरल पद भूषवलेल्या हॅरिस यांनी आपल्याच पक्षाच्या लॉरेटा यांचा पराभव केला होता.


याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील कमला हॅरिस यांचं कौतुक केलं होतं. भारत आणि अमेरिकेच्या संबंध यामुळे आणखी चांगले होऊ शकतात. ओबामा यांचं त्यांना पूर्ण समर्थन होतं. हॅरिस यांची आई भारतीय आणि वडील जमैकाचे राहणारे आहेत. 1960 मध्ये कमला यांची आई चेन्नई येथून अमेरिकेला आली होती.