Shiv jayanti 2023 Dubai Video : `जय भवानी`! शिव जयंतीच्या निमित्तानं दुबईमध्ये महाराजांच्या नावाचा जयघोष
Shiv jayanti 2023 Dubai Video : शिव जयंतीच्या निमित्तानं अगणित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांदरम्यानचे व्हिडीओही समोर आले. पण, हा व्हिडीओ जरा खास आहे.
Shiv jayanti 2023 Dubai Video : श्रीमंत छत्रपतींची जयंती आखातामधील यूएई मध्ये १९ फेब्रुवारी २०२३ रोजी यंदा दोन ठिकाणी साजरी करण्यात आली. भव्य आयोजन दुबईतील जे एस एस स्कूल व ग्लोबल इंडियन स्कूल इथं करण्यात आलं. आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिपयमान ईतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी जे एस एस स्कूल कार्यक्रमाचे आयोजन केलं. त्रिविक्रम ढोल ताशा यूएई च्या सहकार्यानी भव्य असे ढोल ताशा वादन करण्यात आलं.
युएईतील २००० हुन अधिक मराठी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक, चंद्रशेखर जाधव, चैताली जाधव, सुहास हांडे आणि सहकारी पल्लवी बारटके, मंगेश कासार, साक्षी मोरे, संदीप पवार, प्रशांत शिंपी, संदीप शिंपी, अभिजित देशमुख, संतोष भस्मे, रितेश मोरे, अनिश कोटवडे, शिवाजी नारूने, मंदार कुलकर्णी, किशोर मुंडे व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली.
ग्लोबल इंडियन स्कूल येथील कार्यक्रमाचे आयोजन MPFS दुबई यांनी केलं.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंती निमित्ताने दुबईमध्ये MPFS तर्फे भव्य दिव्य असा " शिव जयंती " उत्सव तमाम शिवप्रेमी आणि बाल गोपाळांच्या उपस्थितीत जाज्वल्य अभिमानाने साजरा करण्यात आला. सभासदांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साही प्रतिसादात सकाळी १० वाजता "संयुक्त अरब अमिराती" आणि "भारताचे" राष्ट्रगीत सभागृहात वाजवण्यात आले.
मंडळाचे खजिनदार सुमेय यांनी आपल्या मधुर बासरी वादनाने कार्यक्रमाची वातावरण निर्मित केली. MPFS चे अध्यक्ष देवेंद्र लवाटे ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हातात घेऊन शिवजयंतीचं महत्व सांगत परदेशात असा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं प्रयोजन सांगितलं आणि कलाकारांचं मनोबल उंचावत त्यांना मंचावर आमंत्रित केलं.
हेसुद्धा वाचा : Shiv Jayanti 2023 : फळापासून पानापर्यंत, तांदळापासून तिळाच्या दाण्यापर्यंत; छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी मानवंदना
शिवशाहिरांचा पोवाडा, जिजाऊंचे स्वगत, ऐतिहासिक गोष्टींचे ओघवते कथन, पाळणा, नवीन चित्रपटातील पारंपरिक बाज असणारी गीतं यावेळी सादर झाली. त्यावर सादर केलेली बहारदार नृत्य, पारंपारिक कविता अगदी प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राला लाभलेली कलेची विशाल परंपरा डोकावत होती. हा समारंभ मातृभाषेची, संस्कृतीची,परंपरा आणि अशा अनेक गोष्टींबाबत नकळतच नव्या पिढीला माहिती देऊन गेला. परदेशात राहत असताना आपल्या संस्कृती, परंपरेचे केलेलं जतन या साऱ्यामुळं अनेकांनीच या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.