विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : कोरोना विषाणूद्वारे अख्ख्या जगाला चीनने वेठीला धरलं आहे आणि आता कोरोनावरच्या बनावट प्रतिबंधक लसी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत. त्याचाच भांडाफोड नुकताच समोर आला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 या वर्षामध्ये कोरोनाचा मार सहन कलेले जगभरातले नागरिक, कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस घेण्यासठी उत्सुक आहेत. या प्रतिबंधक लसीमुळे आपण सुरक्षित राहू असा त्यांना विश्वास आहे. मात्र त्यांच्या विश्वासाला छेद देण्याचं षडयंत्र चीनमध्ये सुरू आहे. 


जगाला कोरोनाची डोकेदुखी दिलेल्या चीनमध्येच आता मोठ्या प्रमाणात कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे बनावट डोस तयार केले जात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तब्बल 80 हून अधिक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून 3 हजारांहून अधिक बनावट डोस जप्त केले गेले आहेत.


गंभीर बाब म्हणजे या टोळीकडून सप्टेंबर महिन्यापासूनच बोगस लसीचा पुरवठा केला जात होता. 70 हजार जणांना ही खोटी लस दिल्याची माहिती मिळतेय. तर या बनावट लसी जगभरात पाठवण्यात आल्या असतील अशी शक्यताही चीन प्रशासनानं व्यक्त केली आहे. या बनावट लसींमुळे चिंता वाढली आहे. 


जगभरातून कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत लसीचे बनावट डोस तयार करून स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्याचा हा प्रकार चीड आणणारा आहे. त्यामुळे अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.