लंडन : आपल्यापैकी कोणाला पैसा नको असतो? प्रत्येकाला असं वाटतं असतं की, काही तरी असा चमत्कार घडावा की आपल्याकडे पैशांचा पाऊस पडावा, ज्यामुळे आपण रातोरात श्रीमंत होऊ. परंतु हे सगळं आपण स्वप्नातच पाहू शकतो. खऱ्या आयुष्यात असं होणं शक्य नाही. खऱ्या आयुष्यात फक्त मेहनतीनेच पैसे आपण कमाऊ शकतो. परंतु खरंच असं घडलं तर? रस्त्यानं जाताय आणि अचानक पैशांचा पाऊस पडायला लागला तर? एका महामार्गावर असंच काहीसं घडलं आणि लोकांची इतकी झुंबड उडाली की तब्बल 2 तास ट्रॅफिक जॅम झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मनी हाईस्ट या प्रसिद्ध स्पॅनिश वेब सिरीजच्या तिस-या सीझनच्या पहिल्या भागात माद्रिदमध्ये असा नोटांचा पाऊस पडतो.आणि मग लोक गाड्या थांबवून नोटा गोळा करतात. सगळ्या शहरात ट्रॅफिक जॅम होतो.


असंच काहीसं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये देखील घडलं आहे. हायवेवर नोटांची अशी बरसात झाली. मग काय ! लोकांनी गाड्या थांबवल्या आणि बॅगा भरभरून नोटा आपल्या गाड्यांमध्ये घेतल्या.


या पैशांच्या पावसाचे व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाले. या गोंधळामुळे हाय वे तब्बल 2 तास ठप्प होता.


खरेतर फेडरल डिपॉझिट इन्श्युरन्स कॉर्पोरेशनची कॅश घेऊन एक ट्रक सॅन डिएगोवरून निघाला होता. या ट्रकमधील पैशांच्या काही पेट्या फुटल्या आणि त्यातल्या डॉलर्सच्या नोटा रस्त्यावर उडाल्या. त्यानंतर आता कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलनं लोकांना पैसे परत करण्याचं आवाहन केलंय. अनेकांनी लुटलेले पैसे परतही केल्याचं हायवे पोलिसांचे प्रवक्ता सार्जंट कर्टिस मार्टिन यांनी सांगितलं.


बाकीच्यांनीही पैसे परत करावेत अन्यथा व्हिडीओच्या आधारे कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आलाय. त्यासाठी एफबीआयची मदत घेतली जाणार आहे. देश कोणताही असो, लोकांची मानसिकता तशीच असते. फुकटचा पैसा सर्वांनाच हवा असतो. मग ते आलिशान कारमधून फिरणारे अमेरिकन असले तरीही.