Corona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी
Corona Updates : चीनमध्ये (China) कोरोनची परिस्थिती इतकी वाईट, की विचार करूनच तुम्हीही पडाल चिंतेत. या कोरोनामुळं जगात पुन्हा 2020 चेच दिवस येणार का?
China Corona Updates : संपूर्ण जगातून कोरोना (Corona) परतीच्या वाटेवर लागला आहे, असं चित्र असतानाच पुन्हा एकदा चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गानं डोकं वर काढलं आणि जगभरात पुन्हा एकदा दहशतीचीच लाट पसरली. सध्याच्या घडीला चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार इथं औषधांचाही तुटवडा जाणवू लागला होता. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव असतानाच चीनच्या रुग्णालयांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण पाहायला मिळाले. आता हीच परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. कारण, चीनमध्ये एकीकडे स्मशानभूमीतही मृतदेहांचा खच पडल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये एका दिवसात 10 हजारांहून अधिक मृतदेह शांघायमधील शवागारात पोहोचले. हा आकडा संपूर्ण जगाच्या चिंतेत भर टाकणारा आहे. चीनमधून समोर येणाऱ्या वृत्तानुसार इथं करोना रुग्णांची संख्या काही केल्या नियंत्रणात येण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच इथल्या एका रुग्णालयाच्या शवागाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ही भीषण स्थिती जगासमोर आली आहे. (Shocking news China Corona Updates more than 10 thousnad death bodies in mortuary latest Marathi news )
निम्म्या लोकसंख्येला कोरोनाची लागण...
चीनमध्ये कोरोना स्थिती काही केल्या नियंत्रणात येत नसून, त्यातच आता शांघायमधील एका रुग्णालयाकडून शहरातील जवळपास 25 दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना या विषाणूची लागण होईल असा अंदाज वर्तवला आहे. किंबहुना येणारे दिवस आव्हानात्मक असल्याचं लक्षात घेत रुग्णालयाने कर्मचार्यांना या धर्तीवर तयार राहण्याचा इशाराही दिला आहे.
अवघ्या काही दिवसांत रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांघायमध्येही आपात्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला होता. 28 डिसेंबरला 120 या क्रमांकावर 48534 इतके फोन आले. तर, इथं रुग्णवाहिकांनी 7 हजारहून अधिक फेऱ्या मारल्या. दरम्यान, चीनमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार नव्यानं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ नोंदवली जात आहे. ज्यामुळं या घडीला अवघ्या काही तासांतच Emergancy Ward मधील रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली आहे. आरोग्य यंत्रणांवर यामुळं प्रचंड ताण असल्याचं दाहक वास्तव चीनमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. शांघाय जिओ टोंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनशी संलग्न असणाऱ्या रुइजिन हॉस्पिटलच्या चेन एर्झेन (उपसंचालक) यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, रुग्णालयात दाखल झालेल्या 80 टक्के रुग्णांमध्ये जवळपास 50 टक्के रुग्ण वृद्ध आणि गंभीर अवस्थेतील असल्याचं कळत आहे. हायपोक्सिमिया, छातीत जडपणा आणि श्वासोच्छवासात त्रास असलेल्या काही गंभीर रुग्णांचाही यात समावेश आहे.