निर्दयी नर्स! नवजात बालकांचा जीव घ्यायची, नंतर आई-वडिलांना शोकसंदेश पाठवायची
शांत डोक्याने तीने एक-एक करत सात नवजात बालकांचा जीव घेतला, अशी करायची हत्या
Shocking News : जिच्यावर जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, ती नर्सच (Nurse) मारेकरी निघाली तर? अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नर्सने एक दोन नाही तर तब्बल सात नवजात बालकांचा जीव घेतल्याचा तिच्यावर आरोप आहे. धक्कादायक म्हणजे बालकांना मारल्यानंतर ती त्यांच्या आई वडिलांना शोकसंदेश पाठवायची. ब्रिटनमधली (Britain) ही घटना असून लूसी लेटबी (Lucy Letby) असं या निर्दयी नर्सचं नाव आहे.
असं संपवायची नवजात बालकांना
नर्स लूसी लेटबी अतिशय निर्दयीपणे आणि शांते डोक्याने नवजात बालकांना संपावायची. रिकामं इंजेक्शन ती नवजात बालकांना टोचायची. ज्यामुळे बालकांचा मृत्यू ओढवत होता. एकदा इंजेक्शन टोचून मृत्यू न झाल्यास ती बालक दगावत नाही तोपर्यंत अनेकवेळा इंजेक्शन द्यायची.
एका मुलीला तर तीने तब्बल पाच वेळा रिकामं इंजेक्शन टोचलं. रिकाम्या इंजेक्शनमुळे बालकांच्या शरीरात हवा भरली जात होती. त्यामुळे बालकं अत्यवस्थ होऊन दगावली जात.
अशी झाली लूसीला अटक
लूसी ज्या रुग्णालयात काम करत होती, त्या रुग्णालयात नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत होतं. बालकं दगावण्याचं कारणही जवळपास सारखंच होतं. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला. या प्रकरणाचा तपास सुरु झाला. ज्यावेळी मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी ड्युटीवर लूसी लेटबी ही नर्स असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. नॉर्मल असणारी बालकंही तिच्या ड्युटीच्यावेळी आजार पडत आणि नंतर त्यांचा मृत्यू होत होता. याप्रकरणाची सखोल चौकशी केली असता लूसीचे काळे कारनामे समोर आले.
किती बालकांचा घेतला जीव
लूसी लेटबीने 2015 ते 2016 या काळात इंग्लंडच्या काऊंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयातील तब्बल सात मुलांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. यात एक मुलगी आणि सात मुलांचा समावेश आहे. या काळात तिने 10 नवजात बालकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. यापैकी तीन बालकं सुदैवाने बचावली.
2017 मध्ये पोलिसांनी रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूचा तपास सुरु केला. यात लूसी लेटबीचाच हात असल्याचं समोर आल्यानंतर 2020 मध्ये तिला अटक करण्यात आली. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे.