काबूल : काबूलच्या विमानतळावर अमेरिकन सैन्यानं तुफान गोळीबार केला आहे. या गोळीबाराचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काबूल विमानतळावर अक्षरशः रक्तपात सुरू आहे. विमानतळावर जमलेला प्रत्येक जण जीवाच्या आकांतानं पळापळ करताना दिसत आहे. लहानग्या मुलांना हातात घेऊन महिला वाट मिळेल तिथे धावत आहेत. गोळ्या चुकवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर जीवाच्या भीतीनं लोक देश सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवाय अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांसाठी काम करणाऱ्या अफगाण लोकांना तालिबानी जिवंत सोडणार नाहीत, अशी भीती त्या लोकांना वाटत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं अफगाण नागरिक काबूल विमानतळावर जमा होत आहेत. त्यांना माघारी धाडण्यासाठी अमेरिकन सैनिक वारंवार गोळीबार करत आहेत. 


अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाण नागरिकांचं आयुष्य मोठ्या संकटात सापडले आहेत. या ठिकाणी महिलांच्या जीवाला अधिक धोका आहे. त्यामुळे काबूल विमानतळावर महिलांचा आक्रोश पाहायला मिळत असून, 'आम्हाला वाचवा... तालिबानी येत आहेत...' असं म्हणत अफगाण महिला मदतीसाठी विनंती करत आहेत. सैनिक महिलांची असहाय्यता पाहत आहेत, पण इच्छा असली तरी ते काहीही करू शकत नाहीत.