मलेशियात भारतीय महिला पर्यटक रस्ता खचल्याने 26 फूट खोल सिंकहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वालालंपूर येथे शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. रिपोर्ट्सनुसार, महिला फुटपाथवरुन चालत असताना रस्ता अचानक खचला आणि महिला थेट 26 फूट खाली कोसळली. महिलेचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. मात्र अद्याप महिलेचा काही शोध लागलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेपत्ता महिला पर्यटकाचा शोध घेण्यासाठी क्वालालंपूरमधील बचावकर्ते दोन्ही मॅनहोल्सच्या बाजूचा ढिगारा बाजूला करण्यासाटी उच्च-दाब पाण्याच्या जेटचा वापर करतील. घटनास्थळावरील गटार आणि 69 मीटर अंतरावर असलेल्या अन्य ठिकाणी ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असं वृत्त चॅनल न्यूज एशियाने दिले आहे.


चॅनल न्यूज एशियाने असंही सांगितलं आहे की, क्वालालंपूर सिटी हॉलने शोध आणि बचाव कार्यांबद्दल अपडेट दिलं असून रविवारी संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत पाणी संथगतीने वाहत असलेल्या ठिकाणी एका ठिकाणी फ्लशिंग ऑपरेशन्स करण्यात आले, मात्र त्यात यश मिळालं नाही. क्वालालंपूर सिटी हॉलच्या म्हणण्यानुसार, बचावकर्ते पंताई दलम ट्रीटमेंट प्लांटचा शोध घेत आहेत, जिथे गटार संपते. बेपत्ता महिला सापडत नाही तोपर्यंत शोध घेतला जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



सोशल मीडियावर महिला जमीन खचल्यानंतर खाली कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, महिला फुटपाथवरुन अचानक चालत असताना अचानक रस्ता खचतो. काही सेकंदात महिला खाली कोसळते. यावेळी तिथे उपस्थित इतर लोक आश्चर्याने पाहत राहतात. 


महिलेला शोधण्यासाठी, एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये खनिज आणि भूविज्ञान विभाग, क्वालालंपूर सिटी हॉल, रॉयल मलेशिया पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश आहे.