Shop Owners Jailed For Giving Salary Hike: सामान्यपणे पगारवाढ दिल्यानंतर कंपनीचं किंवा नोकरी देणाऱ्याचं कौतुक केलं जातं. मात्र एका देशामध्ये कर्मचाऱ्याला पगारवाढ देणाऱ्या व्यक्तीला चक्क अटक करण्यात आली आहे. ही घटना घडली आहे आशियामधील म्यानमार देशामध्ये. येथील एका दुकानदाराला त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगारवाढ दिल्याप्रकरणी अटक झाली आहे. देशामध्ये महागाई वाढत असताना अशी वेतनवाढ दिल्याने ही अटक झाली आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील लष्करी सरकारच्या सैन्याने पाये फ्यो झाव (Pyae Phyo Zaw) नावाच्या दुकानदाराला अटक केली आहे. या व्यक्तीच्या नावावर असलेली तीन मोबाईलची दुकानं सरकारने बंद केली आहेत. पगारवाढ दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 


अशाप्रकारे 10 दुकानदारांना अटक; आता 3 वर्ष जेलमध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाप्रकारे पगारवाढ दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला पाये फ्यो झाव हा एकमेव व्यक्ती नसून किमान 10 दुकांनादारांना म्यानमारमध्ये अटक करण्यात आली आहे. देशामध्ये अशांतता पसरवण्यासंदर्भात सध्या सत्तेत असलेल्या लष्करी सरकारच्या नव्या कायद्यांनुसार या सर्वांना किमान 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या दुकानदाराला लष्करी जवान दुकानातून उचलून घेऊन गेल्याचं सांगितलं जात आहे.


पण पगारवाढ दिल्यानंतर अटक का केली जातेय?


म्यानमारमधील कायद्यांसंदर्भातील जाणकार असलेल्या तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढ देणे हा येथील कायद्यानुसार गुन्हा नाही. मात्र सध्याच्या सरकारी धोरणांमुळे पगारवाढ देणाऱ्यांना अटक केली जात आहे. पगारवाढ देऊन लोकांना महागाई वाढत असल्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडून सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सध्याच्या सरकारचं म्हणणं आहे, असं एका तज्ज्ञाने 'न्यूयॉर्क टाइम्स'शी बोलताना सांगितलं. 


नक्की वाचा >> ...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेश


बंद केलेल्या दुकानाबाहेरील नोटीसवर काय कारण देण्यात आलं आहे?


सध्या म्यानमारमध्ये सत्तेत असलेल्या लष्करी सरकारच्या मानण्यानुसार, महागाईचा संदर्भ देत पगारवाढ दिली तर जनतेमधून असंतोष वाढू शकतो. या वाढलेल्या असंतोषामुळे सत्ताधाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. लष्करी जवानांनी पगारवाढ दिल्याप्रकरणी पाये फ्यो झावला अटक केल्यानंतर त्याच्या एका दुकानाबाहेर नोटीसही लावली आहे. "समाजिक शांतता आणि कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याने दुकान बंद करण्यात आलं आहे," असं या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. 


पगारवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय?


"आम्हाला पगारवाढ देण्यात आल्याचा आनंद आहे. मात्र आता दुकान बंद करायला लावल्याने आम्हाला पगारच मिळणार नाही," असं पाये फ्यो झावकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं आहे. "वस्तूंचे वाढलेले दर आणि महागाईमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना फटका बसत आहे," असंही या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.


नक्की वाचा >> वनविभागानेच दिली साडेचार लाख घुबडांची सुपारी; शिकारी तैनात! कारण धक्कादायक


मागील 3 वर्षांपासून आर्थिक संघर्ष


लोकशाही मार्गाने 2021 मध्ये सत्तेत आलेल्या म्यानमारमधील सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लष्कराने कैद केलं आहे. तेव्हापासूनच देशामध्ये आर्थिक समस्यांनी डोकं वर काढलं आहे. लष्करी सरकारविरोधात येथे वारंवार उठाव आणि आंदोलने होत असली तरी ती चिरडून टाकली जात आहे.