Boss New Rule In Office: ऑफिस म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. खरं तर कोरोना कालावधीमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु झालं आणि अनेकांना घरुन काम करायची सवय पडली. काळाची गरज म्हणून कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली. मात्र आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा ऑफिस सुरु झाले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर ऑफिस एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. हे कारण म्हणजे रेडिटवरील एक पोस्ट. 


नेमका हा नियम काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडिटवरील एका युझरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने कंपनीमधील एका अजब नियमाबद्दल सांगितलं आहे. पोस्ट शेअर केलेली व्यक्ती संबंधित कंपनीमध्ये 18 वर्षांपासून कामाला आहे. मात्र या कंपनीमध्ये नव्याने रुजू झालेल्या बॉसने एक अजब नियम कंपनीत लागू केला आहे. नव्या बॉसने सर्व कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या नव्या नियमांच्या यादीमध्ये एका नियमामध्ये जेव्हा जेव्हा कर्मचारी लघवीसाठी किंवा रिफ्रेशमेंट ब्रेक अथवा लंच ब्रेक घेतील तेव्हा त्यांना लॉग आऊट करावं लागणार आहे. म्हणजेच अगदी काही मिनिटांसाठी लघवी करायला जागा सोडली तरी लॉग आऊट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 


तक्रारीची तयारी


या व्यक्तीने शेअर केलेल्या पोस्टवरुन नवीन वाद सुरु झाला आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या नियमांवरुन आणि ते कशाही पद्धतीने वरिष्ठांकडून वापरले जात असल्याच्या मुद्द्यावरुन अनेकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. या व्यक्तीने शेअर केलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये 30 मिनिटांचा जेवणाचा ब्रेक दिला जातो. त्यावेळेस लॉग आऊट करण्यास काही हरकत नाही पण लघवीला जातानाही लॉग आऊट करणं फारच चुकीचं आहे असं म्हटलं आहे. याचा परिणाम कामावर होत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. येथील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या निर्णयाला विरोध केला. याविरोधात वरिष्ठांकडे लेखी तक्रार करण्याची तयारीही काही कर्मचाऱ्यांनी केल्याचं समजतं. 



लोकांनी नोंदवल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया


या संदर्भात संबंधित व्यक्तीने 'रेडिट'वरुन मदत मागितली असता काहींनी थेट राजीनामा देण्याचा सल्ला दिला. तर काहींनी एचआरकडे यासंदर्भात तक्रार करण्याबद्दलही या व्यक्तीला सुचवलं. काहींनी या पोस्टवर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींनी या बॉसवरच कारवाई केली पाहिजे असं म्हणत या कठोर नियमाबद्दल संताप व्यक्त केला. लघुशंकेसारख्या आवश्यक बाबीसाठीही हा लॉगआऊटचा नियम लागू करणं म्हणजे निव्वळ वेडेपणा असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.