बीजिंग: अलिबाबाचे संस्थापक आणि चिनी अब्जाधीश जॅक मा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी यशस्वी करियरसाठी कर्मचाऱ्यांना '९९६ वर्क कल्चरचा' फॉर्म्युला सांगितला होता. याचा अर्थ कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील सहा दिवस सकाळी ९ ते रात्री ९, असे बारा तास काम करावे, असे त्यांनी सांगितले होते. यानंतर जॅक मा यांनी आपल्या कंपनीतील नवविवाहित कर्मचाऱ्यांना आणखी एक सल्ला दिला आहे. सुखी दाम्पत्य जीवनासाठीचा त्यांचा ६६९ हा फॉर्म्युला सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. याचा अर्थ नवविवाहित जोडप्यांनी आठवड्यातील सहा दिवसात सहावेळा सेक्स करावा, असे जॅक मा यांनी सुचवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅक मा यांच्या अलिबाबा या कंपनीकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. मात्र, यंदाच्या सोहळ्यात जॅक मा यांनी एक पाऊल पुढे जात कर्मचाऱ्यांना सुखी दाम्पत्य जीवनाचा कानमंत्र दिला. कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सेक्स करावा, असे त्यांनी म्हटले. लग्न करण्याचा उद्देश हा संपत्ती जमवणे किंवा घर खरेदी करणे, हा नसतो. तर मूल जन्माला घालण्यासाठी लग्न केले जाते. अशावेळी '९९६' आणि '६६९' या दोन सूत्रांची सांगड घातल्यास कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढते. तसेच त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी जीवनाचा समतोलही साधणे शक्य होते, असेही जॅक मा यांनी सांगितले. 


जॅक मा यांच्या सल्ल्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जॅक मा यांच्या '९९६ वर्क कल्चर'वरही तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकांनी टीका केली होती. हाच धागा पकडून एका युजरने जॅक मा यांच्या '६६९' फॉर्म्युलाची खिल्ली उडविली. ९९६ म्हणजे सलग बारा तास काम केल्यानंतर  '६६९' साठी कोणाच्या अंगात ताकद उरेल का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.