Viral Video: अनेक लोकांना अ‍ॅडव्हेंचरची आवड असते. यासाठी ते आपल्या व्यग्र आयुष्यातून वेळ काढत अशा ठिकाणांचा शोध घेत असतात जिथे त्यांना आपली ही अ‍ॅडव्हेंचरची आवड पूर्ण करता येईल. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. यामध्ये लोक कधी उंच डोंगर, किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाताना, तर काहीजण धोकादायक स्टंटही करताना दिसत असतात. काहीजण जीव धोक्यात टाकत ही स्टंटबाजी करत असतात. पण काही ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत हे स्टंट केले जातात. पण ही सुरक्षा कितपत चांगली आहे याची पडताळणी करणंही गरजेचं असतं. अन्यथा आपण आपला जीवही गमावू शकतो. नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे एका लहान मुलाला अ‍ॅडव्हेंचरसाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. या व्हायरल व्हिडीओत 6 वर्षांचा चिमुरडा तब्बल 40 फूट खाली कोसळताना दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थरकाप उडवणारा हा व्हिडीओ मेक्सिकोमधील आहे. येथे अ‍ॅडव्हेंचरसाठी गेलेला एक 6 वर्षांचा मुलगा तब्बल 40 फूट खोल दरीत कोसळतो. हा व्हिडीओ मेक्सिकोमधील मनोरंजन पार्कातील आहे. हार्नेस तुटल्याने ही दुर्घटना घडते आणि मुलगा खाली कोसळतो. 


व्हायरल व्हिडीओ दिसत आहे, त्यानुसार चिमुरडा जिपलाइनवरुन एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असतो. यावेळी एक व्यक्तीही त्याच्यासह दिसत आहे. हा व्यक्ती कदाचित तेथील कर्मचारी असावा. ती व्यक्ती मुलाला जिपलाइनवरुन ढकलत पुढे नेत असते. काही वेळाने जेव्हा दोघंही जिपलाइनच्या मध्यावर पोहोचतात तेव्हा थांबलेले असतात. त्यानंतर काही सेकंदात मुलाचा हार्नेस तुटतो आणि तो 40 फूट खाली कोसळतो. 



न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्या ठिकाणी खाली एक कृत्रिम तलाव होता. सुदैवाने मुलगा तलावात पडल्याने त्याला फार गंभीर इजा झाली नाही अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.


दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. मुलगा सुरक्षित आहे का? अशी विचारणा अनेकांनी केली आहे. तर अनेकांनी अशा धोकादायक स्टंटमध्ये मुलांना सहभागी करुन घेता कामा नये असा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे स्टंट करणार असाल तर आधी सुरक्षेची तपासणी नक्की करा.