Slovakia Prime Minister Robert Fico : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना ज्याप्रकारे गोळी मारण्यात आली होती, तशीच घटना आता स्लोव्हाकियामध्ये घडली आहे. स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (Robert Fico) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर रॉबर्ट फिको यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या हँडलोवा शहरात ही घटना (Slovak Prime Minister Attacked) घडली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्लोव्हाकियाच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. गोळीबार करणारा तोच होता की आणखी कोणी, याची पुष्टी होऊ शकली नाही, अशी देखील माहिती समोर येतीये. हल्लेखोर नेमके किती होते? याची देखील चौकशी आता सुरू करण्यात आलीये. स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांना एकूण दोन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत तर दुसरी पोटात लागल्याची प्राथमिक माहिती आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर देखील अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्यामुळे आता जगभरातील सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत.


पंतप्रधान फिको बैठकीनंतर हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर लोकांशी बोलत होते, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला. राजकीय वादातून हा हल्ला झालाय का? असा सवाल देखील विचारला जातोय. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी पंतप्रधानांना रुग्णालयात नेले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.


दरम्यान, स्लोव्हाकियाच्या सरकारने बुधवारी सार्वजनिक रेडिओ आणि टेलिव्हिजन सेवांच्या विवादास्पद फेरबदलास मान्यता दिली होती. त्यामुळे सरकार मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. तसेच पंतप्रधान फिको यांनी नेहमी रशियाला झुकतं माप दिल्याने त्यांचे विरोधक देखील आक्रमक झाले होते. कोविड महामारीच्या काळात फिको मास्क, लॉकडाउन आणि लसीकरणाविरुद्ध देशातील सर्वात प्रमुख आवाज बनले होते. त्यानंतर त्यांनी याच मुद्द्याच्या आधारावर निवडणुकीत विजय मिळवला अन् तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा मान मिळवला होता.