मुंबई :  येत्या श्रावणी सोमवारी म्हणजेच २१ ऑगस्ट दिवशी अमेरिकेतील १४ राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भर दिवसा होणार्‍या अंधारात ग्रह तारकांचे दर्शन आणि नभांगणातील इतर आविष्कार पाहण्याची संधी मिळणार आहे. 


सूर्यग्रहणातील ही खग्रास स्थिती केवळ दोन मिनिटे चाळीस सेकंद दिसणार आहे. पण हा आविष्कार भारतातून दिसणार नाही. हे सूर्य ग्रहण संपूर्ण अमेरिका, हवाई, उत्तर पूर्व प्रशांत महासागर, युरोपचा काही भाग आणि पश्चिम आफ्रिकेचा काही भागातून दिसणार आहे.


या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत खगोलप्रेमीनी गर्दी केली आहे. विमान कंपन्यांनीही भाडेवाढ केली असून खग्रास पट्ट्यातील हॉटेल्सनीही  भाडे दुप्पट केले आहे. ग्रहण पहाण्यासाठी चष्मे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाहतूक व्यवस्थाही उत्तम प्रकारे ठेवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या  सोमवारी २१ ऑगस्ट रोजी अमेरिकेत मोठा ' सूर्यग्रहणोत्सव ' साजरा होत आहे. 


भारतीय वेळेप्रमाणे २१ ऑगस्ट रोजी रात्री १०:१८ पासून उत्तर रात्री ०१:३१ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून खग्रास स्थिती दिसणार आहे. यानंतर ८ एप्रिल २०२४ रोजी होणा-या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या बारा राज्यातून दिसणार आहे. त्यानंतर १२ ऑगस्ट २०४५ रोजी होणा-या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकाच्या दहा राज्यातून दिसणार आहे.  भारतातून  हे खग्रास सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहता येणार नसले तरी टीव्हीच्या आणि संगणकाच्या माध्यमातून  ग्रहणाचे अविष्कार पाहता येतील.