केप कानाव्हेरल: मानवी इतिहासात प्रथमच एका खासगी कंपनीच्या अंतराळयानाच्या यशस्वी उड्डाणाचा इतिहास शनिवारी रचला गेला. एलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीच्या रॉकेटने नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन शनिवारी अवकाशात यशस्वी उड्डाण केले. त्यामुळे व्यावसायिक अंतराळमोहिमांच्या नव्या युगाला प्रारंभ झाला आहे. तसेच यानिमित्ताने विशेषत: अमेरिकेसाठी अंतराळ क्षेत्रातील संधीची कवाडे खुली झाली आहेत. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, SpaceX च्या या रॉकेटमधून नासाच्या डग हर्ली आणि बॉब बेहनकेन या दोन अंतराळवीरांनी अवकाशात उड्डाण केले. साधारण ५० वर्षांपूर्वी अपोलो अंतराळयान ज्या तळावरून अवकाशात झेपावले होते तेथूनच SpaceX च्या रॉकेटने उड्डाण केले. आता रविवारी हे यान अवकाशातील अमेरिकन स्पेस स्टेशनवर पोहोचेल.  हे दोन्ही अंतराळवीर त्याठिकाणी चार महिने थांबतील. यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर परततील.

सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक लाखाहून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जॉर्ज फ्लॉयिड या कृष्णवर्णीयाच्या मृत्यूवरुन सध्या अमेरिकेत असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर या अंतराळ मोहीमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना नवी उमेद मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. 



तसेच या अंतराळ मोहीमेच्या यशामुळे खासगी उद्योजकांनाही नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी ही गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होती. मात्र, या अंतराळमोहिमेच्या यशाने स्पेस एक्सच्या अंतराळात मानवी यान पाठवण्याच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनाच अंतराळात मानवी यान पाठवणे शक्य झाले आहे.