कोलंबो: बॉम्बस्फोटाच्या मालिकेमुळे हादरलेल्या श्रीलंकेतील दहशत अजूनही कायम आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोलंबो येथील चर्चच्या परिसरामध्ये स्फोट झाला. येथील एका गाडीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कालच्या स्फोटांच्या मालिकेनंतर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आज सकाळपासून कोलंबोमध्ये पोलिसांकडून जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना कोलंबो शहरातील मुख्य बस स्थानकाच्या परिसरात तब्बल ८७ बॉम्ब डिटोनेटर्स सापडले. त्यामुळे कोलंबोत आणखी मोठा घातपात घडवण्याचा इरादा समोर आला आहे. 



कोलंबो शहर रविवारी आठ बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. चार आलिशान हॉटेल आणि दोन चर्चमध्ये घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २९० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 



लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या संघटनेचा बीमोड केल्यानंतर गेल्या दहा वर्षात श्रीलंकेतील दहशतवाद संपुष्टात आला होता. मात्र, कालच्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर श्रीलंका हादरली आहे. या स्फोटांची चौकशी करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांकडून तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच श्रीलंकेकडून या स्फोटांचा छडा लावण्यासाठी अन्य देशांची मदतही घेण्यात येणार आहे.