Sri Lanka Crisis:  श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटानंतर (Economic Crisis) परिस्थिती बिकट होत चालली आहे.  माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) आणि सरकारविरोधी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने देशाच्या तिन्ही सैन्यांसाठी आदेश जारी केले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणी सार्वजनिक मालमत्तेची लूट केली किंवा हिंसक निदर्शने केली तर त्याला गोळ्या घालाव्यात असे आदेश सैन्याला देण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ आता पोलिसांनाही (Sri Lankan police) तसेच आदेश देण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा आंदोलकांकडून जीवाला धोक्याची परिस्थिती असल्यास गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.


श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. सरकार समर्थक आणि सरकारविरोधी हिंसेनंतर श्रीलंकेची राजधानी कोलंबोत सैन्य तैनात करण्यात आलं असून कर्फ्यू लावण्यात आला आहे. 


हिंसाचार थांबवण्याचं आवाहन
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी जनतेला हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केलं. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर मात करण्यासाठी श्रीलंकेच्या नागरिकांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


पंतप्रधान राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर हिंसा
महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर परिस्थिती बिघडली. राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर राजपक्षे समर्थक नेत्यांविरोधात व्यापक हिंसाचार सुरू झाला.