स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; कर्मचाऱ्याने बदला घेण्यासाठी सिक्रेट रेसिपीच केली लीक
Starbucks Secret Drink Recipes Leaks: स्टारबक्सच्या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकले. याचा बदला घेण्यासाठी तिने थेट सिक्रेट रेसिपीच लीक केल्या.
Fired Starbucks Employee Leaks Secret Drink Recipes: स्टारबक्सच्या (Starbucks) कॉफीचे जगभरात चाहते आहेत. कॉफीव्यतिरिक्त त्यांचे इतर ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थदेखील चविष्ट असतात. मात्र, स्टारबक्सच्या एका कॉफीची किंमतही कधीकधी बजेटच्या बाहेर असते. स्टारबक्सच्या रेसिपी तुम्हाला घरबसल्या मिळाल्या तर? स्टारबक्स कंपनीच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने या सगळ्या रेसिपी व्हायरल केल्या आहेत. कामावरुन काढून टाकल्याच्या रागात या महिलेने बदला घेण्यासाठी थेट रेसिपीच शेअर करुन टाकल्या आहेत. (Starbucks Secret Drink Recipes)
स्टारबक्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकले. त्यानंतर कंपनीचा बदला घेण्यासाठी तिने थेट स्टारबक्सची रेसिपी बुकच सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्टारबक्सच्या सर्व ड्रिंक्स लोक आवडीने घेतात. मात्र, ती कॉफी व ड्रिंक्स कशी बनवली जाते हे मात्र कोणालाच ठावूक नाही. या रेसिपी कशा बनतात याचा खुलासाही तिने केला आहे. अगदी काही क्षणातच तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
स्टारबक्सहे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय आहे. यात एक्स्प्रेसो ड्रिंक्स, कॅपेचिनो, अमेरिकानो लॅटे यासाठी लोकप्रिय आहे. कंपनीच्या ज्या रेसिपी लीक झाल्या आहेत त्यात व्हाइट चॉकलेट मोचा, कोकोनटमिल्क व्हॅनिला लॅटे, व्हॅनिला स्वीट क्रीम कोल्ड ब्रीयू कॉफीसारख्या ड्रिंक्सचा समावेश आहे. व्हायरल झालेल्या या चॅटमध्ये प्रत्येक रिसेपी सविस्तर सांगण्यात आली आहे.
स्टारबक्सच्या माजी कर्मचारीने शेअर केलेल्या रेसिपीमध्ये कोणत्या गोष्टीचे किती माप असावे, हे देखील नमूद करण्यात आले आहे. खरंतर कंपनीच्या सिक्रेट रेसिपी शेअर करणे गैरकानुनी आहे. महिलेने केलेल्या या कृत्यामुळं कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अद्याप स्टारबक्सकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा वक्तव्य समोर आलेले नाहीये. मात्र, सोशल मीडियावर या रेसिपींची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, रेसिपी लीक करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कंपनीतून का काढून टाकण्यात आलं होतं हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. मात्र, या महिलेने अजाणतेपणीच लोकांना खुश करुन टाकलं आहे. आता घरच्या घरीही लोक स्टारबक्सची कॉफी करु शकणार आहेत. स्टारबक्सचे जगभरात 36,000हून जास्त स्टोअर आहेत. तर भारतात टाटा ग्रुपसोबत स्टारबक्स संयुक्तरित्या स्टोअर चालवत आहेत.