वैद्यकीय क्षेत्रात अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. एका डॉक्टरला ऑपरेशन दरम्यान रुग्णाकडून कॅन्सरची लागण झाली आहे. ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण मेडिकल जगतात खळबळ उडाली आहे. एका 53 वर्षीय सर्जनने 32 वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून कर्करोगाचा एक दुर्मिळ ट्यूमर काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेलमधील अहवालानुसार, ऑपरेशनदरम्यान डॉक्टरचा हात कापला गेला होता, परंतु लगेचच निर्जंतुकीकरण करून मलमपट्टी करण्यात आली. मात्र, पाच महिन्यांनंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की, हात कापलेल्या ठिकाणी एक लहान गाठ निर्माण झाली आहे. तपासाअंती असे आढळून आले की, ती गाठ ही घातक ट्यूमर होती आणि तोच प्रकारचा कर्करोग रुग्णाच्या शरीरात आढळून आला होता. तपासणीनंतर, तज्ञांनी पुष्टी केली की ही गाठ रुग्णाच्या कर्करोगाशी संबंधित ट्यूमर पेशींमुळे झाली आहे.


असा झाला कॅन्सर ट्रान्सफर


वैद्यकीय अहवालानुसार, ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांच्या कापलेल्या हातातून रुग्णाच्या ट्यूमरच्या पेशी त्याच्या शरीरात पोहोचल्या. साधारणपणे, जेव्हा परकीय ऊती किंवा पेशी शरीरात प्रवेश करतात तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती त्यांचा नाश करते. परंतु या प्रकरणात डॉक्टरांच्या शरीराची प्रतिकारशक्ती ट्यूमर पेशी नष्ट करण्यात अपयशी ठरली.


वैद्यकीय इतिहासातील ही दुर्मिळ घटना


हे प्रकरण पहिल्यांदा 1996 मध्ये नोंदवले गेले होते आणि नुकतेच 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित झाले आहे. अहवालानुसार, या दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाला वैद्यकीय भाषेत 'मॅलिग्नंट फायब्रस हिस्टियोसायटोमा' असे म्हणतात, जो सॉफ्ट टिश्यूमध्ये विकसित होतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशी केस फारच दुर्मिळ आहे आणि त्याची शक्यता नगण्य आहे. सामान्यतः, प्रत्यारोपणादरम्यान प्रतिकारशक्ती परदेशी पेशी स्वीकारत नाही. मात्र या प्रकरणात डॉक्टरांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचे सिद्ध झाले.


आता डॉक्टरांची प्रकृती कशी आहे?


डॉक्टरांची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली आणि दोन वर्षानंतरही त्यांच्या शरीरात कर्करोग परत आला नाही. हे प्रकरण वैद्यकीय विश्वात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी एक नवीन विषय बनले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, तज्ञांना आढळून आले की कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरची प्रतिकारशक्ती कमकुवत असावी, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी त्याच्या शरीरात प्रवेश करू लागल्या. रिसर्चनुसार डॉक्टरांना झालेला कॅन्सर हा अतिशय दुर्मिळ असून आतापर्यंत फक्त 1400 लोकांना याची लागण झाली आहे. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)