फ्रान्स, इंडोनेशियात दहशतवादी हल्ला; १३ ठार, अनेक जखमी
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी झालेत
नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. आजचा रविवार हा दहशतीचा रविवार आहे की काय असा प्रश्न पडावा अशा घटना घडल्य़ा आहेत. इंडोनेशियात चर्चवर आत्मघाती हल्ल्यात ९ जणांचा बळी गेलाय. तर फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये आयसीसच्या हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय.
इंडोनेशियात ९ ठार ४१ जखमी
इंडोनेशियात चर्चवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू तर ४१ जण जखमी झालेत. इंडोनेशियामधील जावा शहराच्या पूर्वेकडील सुरबाया इथल्या तीन वेगवेगळ्या चर्चमध्ये स्फोट झालेत. हे सर्व स्फोट अवघ्या दहा मिनिटांमध्ये घडवून आणले आहेत. पहिला स्फोट सकाळी साडेसात वाजता झाला. सांता मारिया कॅथलिक चर्चवर झालेल्या हल्ल्याची ही माहिती आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
पॅरिसमध्ये २ ठार अनेक जखमी
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी झालेत. पोलिसांच्या कारवाईत अज्ञात हल्लेखोर ठार झाला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं स्वीकारलीय. शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या मध्यवर्ती भागात एका अज्ञात व्यक्तीनं आसपास असलेल्या लोकांवर चाकूहल्ला सुरु केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झालेत. चौघा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. गेल्या ३ वर्षांत फ्रान्समध्ये अशा अनेक घटना घडल्या असून यांत अनेक लोकांचा जीव गेलाय.