नवी दिल्ली : स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. कारण स्विस बँकेत ज्यांचं अकाऊंट आहे आणि ज्यांनी आपला काळा पैसा या खात्यांमध्ये जमा केला आहे ती सगळी माहिती भारत सरकारला देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वित्झर्लंड सरकारसोबत झालेल्या ऑटोमॅटिक सूचना आदान-प्रदान करारामुळे स्विस बँकेत पैसा जमा केलेल्या भारतीय व्यक्तींच्या खात्याची गोपनीय माहिती आता केंद्र सरकारला मिळू शकणार आहे. या करारामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणणार हे निश्चित आहे. कारण या खात्यांसंदर्भातली माहिती सातत्यानं स्वित्झर्लंड सरकार भारताकडे पाठवणार आहे.


भारतासोबत झालेल्या आर्थिक खात्यांच्या माहितीसंदर्भातल्या आदान-प्रदान करारामुळे हे स्पष्ट होणार आहे. स्वित्झर्लंड सरकारनं प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत यासंदर्भातला विस्तृत अहवाल मांडण्यात आला आहे. स्वित्झर्लंडसोबतच भारतानं इतर ४० देशांसोबत माहिती आदान प्रदान करण्याचे करार केले आहेत.


या करारांमुळे भारतीय लोकांची बँक खाती, त्यांची नावं आणि इतर महत्त्वाचे तपशील भारताला मिळू शकणार आहेत. स्वित्झर्लंड सरकार यासंदर्भातला एक कायदाच तयार करणार आहे आणि त्याद्वारे भारतीयांची कोणती खाती स्विस बँकेत आहेत त्यात किती पैसा आहे? हा पैसा बाळगणारे खातेदार नेमके कोण आहेत ही सगळी माहिती केंद्र सरकारकडे सुपूर्द करणार आहे.