Telegram CEO Arrested: टेलिग्राम मेसेजिंक अ‍ॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांना अटक करण्यात आली आहे. पॅरीसच्या बॉर्गेट विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं. समोर आलेल्या महितीनुसार पावेल दुरोव हे खासगी जेटमधून अजरबैजानमधून बाँर्गट विमानतळावर पोहोचले होते. त्यांच्या विरोधात फ्रेंच प्रशासनाने अटक वॉरंट जारी केलं होतं. 


कोण आहे पावेल दुरोव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावेल दुरोव हे 39 वर्षांचे असून रशियन वंशाचे उद्योजक आहेत. त्यांनी 2013 मध्ये टेलिग्रामची स्थापना केली होती. भारतात हे अॅप फार कमी वेळात खूप लोकप्रिय झाले. चॅटसोबतच जास्त एमबीच्या फाइल्स सहजपणे पाठवण्यासाठी यूजर्सचा याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रायव्हसी, एन्क्रिप्शन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जोरदार भर दिल्याबद्दल टेलिग्राम प्लॅटफॉर्मने जगभरात आपली ओळख निर्माण केली. टेलिग्रामचे ॲप रशिया, युक्रेन आणि माजी सोव्हिएत युनियनमध्ये संपर्काचे एक महत्त्वाचा स्रोत बनले आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काही विश्लेषकांनी याचे वर्णन सध्या सुरू असलेल्या युद्धातील ‘आभासी युद्धभूमी’ असे केले आहे.


काय आहे वाद?


टेलिग्राम नेहमीच सरकारी नियंत्रणाच्या विरोधात राहिले आहे. टेलीग्रामवर मॉडरेशनची कमी असल्याने याचा वापर कथितरित्या मनी लॉंड्रींग, ड्रग्ज तस्करीसाठी केला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. टेलिग्रामवरील कंटेंट सेन्सॉर करण्यासाठी किंवा बॅकडोअर ऍक्सेससाठी जगभरातील सरकारांच्या दबावाचा टेलिग्रामने सातत्याने प्रतिकार केला आहे. ज्यामुळे त्यांची प्रतिमा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक म्हणून निर्माण झाली आहे. असे असताना अलिकडच्या वर्षांत टेलीग्रामचा वापर अतिरेकी गट आणि गुन्हेगारांनी करायला सुरुवात केल्याचा आरोप आहे. टेलिग्राम्या एन्क्रिप्शन वैशिष्ट्यांचा वापर करून बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याचे म्हटले जात आहे. फ्रान्ससह युरोपीय देशांनी टेलीग्रामवर कठोर मॉडरेशन पॉलिसी लागू न केल्याबद्दल टीका केली आहे.


फ्रान्सने जारी केले होते वॉरंट 


फान्सने पावेल दुरोव विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट जारी झाल्यापासून टेलिग्रामच्या संस्थापकाने फ्रान्स आणि युरोपला जाणे टाळले होते. कायद्याची अंमलबजावणी न करणे, अंमली पदार्थांची तस्करी, मुलांविरुद्धचे गुन्हे आणि फसवणुकीत सहभाग हे आरोप निश्चित करुन दुरोवविरोधात अटक वॉरंट जारी केले. रशियन वंशाचे टेलिग्रामचे संस्थापक दुरोव सध्या दुबईत राहतात. टेलीग्रामचे जगभरात 900 दशलक्षाहून अधिक यूजर्स आहेत.


रशियासोबतचे संबंधही वादात  


दुरोव यांनी ऑगस्ट 2021 मध्ये फ्रेंच नागरिकत्व स्वीकारले. दुरोव हे व्हीकॉन्टाक्टे सोशल नेटवर्कचे संस्थापक देखील आहेत. VKontakte यूजर्सचा डेटा रशियन सुरक्षा एजन्सीना देण्यात त्यांनी नकार दिला. यानंतर त्यांनी 2014 मध्ये रशिया सोडले. नंतर रशियानेही टेलिग्रामवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. रशियन भाषिक लोक मोठ्या प्रमाणावर टेलिग्राम वापरतात. याद्वारे युक्रेनमधील युद्धाची महत्त्वाची माहिती शेअर केली जात आहे.रशियन सैन्य संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करते, असेही म्हटले जाते.