नवी दिल्ली : अमेरिका आणि रशिया यांच्यातला तणाव शिगेला पोहचलेला असताना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी नवा गौप्यस्फोट केलाय. पुढच्या महिन्यात युरोप दौऱ्यावर रशियाचे राष्ट्रपती व्हालदमिर पुतीन यांच्यासोबत शिखर परिषद घेण्याचा मनसुबा ट्रम्प यांनी जाहीर केलाय. ट्रम्प येत्या ११ आणि १२ जुलैला नाटो देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्रसेल्समध्ये जाणार आहेत. त्याच दौऱ्यानंतर ते लंडनमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी चर्चा करणार आहेत. याच दौऱ्याच्या आसपास पुतीन यांच्यासोबत शिखरपरिषद होण्याची शक्यता ट्रम्प यांनी अमेरिकेत बोलून दाखवली.  अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन सध्या रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा केलीय. रशिया आणि अमेरिकेमध्ये सीरियातल्या गृहयुद्घामुळे कमालीचा तणाव आहे.


काय आहे प्रकरण ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया सीरियातील बशर अल असद सरकारच्या पाठिशी आहे. तर अमेरिका असद यांच्या हुकूमशाही राजवाटीविरोधात लढणाऱ्या बंडखोरांना लष्करी मदत करत आहे. याच मुद्द्यावरून रशिया आणि अमेरिकेत गेल्या तीन चार वर्षात वारंवार तणावाची स्थिती चिघळत गेली आहे.


महत्त्वाची घटना


रशियाच्या आक्रमक पवित्र्याला आळा घालण्यासाठी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांकरवी रशियावर अनेक आर्थिक आणि सामरिक निर्बंध घातले आहेत. पण रशिया निर्बंधांना बधलेला नाही...त्यामुळे अमेरिका आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख एकमेकांना शिखर परिषदेच्या माध्यमातून भेटणं ही जागतिकच्या दृष्टीनं महत्वाची घटना असणार आहे.