टेस्ला कंपनीच्या अडचणीत वाढ! पुढील तीन महिन्यात इतक्या कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ
टेस्ला कंपनीत लाखो कर्मचारी काम करतात. मात्र टेस्ला कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे
Tesla Cost Cutting: टेस्लाचे सीईओ एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या टेस्ला कंपनीत लाखो कर्मचारी काम करतात. मात्र टेस्ला कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. पुढच्या तीन महिन्यात 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता असल्याचं टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सांगितलं. ग्लोबल मायक्रो इकोनॉमिक परिस्थितीतील बदल झाल्याचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे टेस्ला आपले एकूण कर्मचारी सुमारे 3.5 टक्के कमी करणार आहे.
1 लाखांहून अधिक कर्मचारी
टेस्ला कंपनी 1,00,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक वाढली होती. गेल्या आठवड्यातही कंपनीत टाळेबंदीची लाट आली होती. ज्यामध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. यात पगारदारच नव्हे तर मजूरांचाही समावेश होता.
इलेक्ट्रेकच्या अहवालानुसार, टेस्लाने उत्तर अमेरिकेत आपल्या विक्री आणि वितरण कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. टेस्ला जूनमध्ये संपणाऱ्या तिमाहीत अडचणींचा सामना करत आहे. खुद्द सीईओ मस्क यांनीही हे अवघड जाणार असल्याचे म्हटले आहे.
नव्या भरतीवर बंदी
या महिन्याच्या सुरुवातीला, मस्क यांना टेस्लाच्या अधिकाऱ्यांना एका ईमेलमध्ये सांगितले की, अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता कर्मचार्यांमध्ये 10 टक्के कपात करण्याची गरज आहे. अगदी कंपनीने नवीन भरती थांबवण्यास सांगितले आहे.