चियांग राय : थायलंडमधील एका गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीमला १७ दिवसानंतर सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. फुटबॉल टीममधील सर्व खेळाडूंवर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या खेळाडूंचा एक व्हिडिओ थायलंडच्या सरकारकडून जाहीर करण्यात आलाय. यामध्ये सर्व खेळाडू आनंदीत आणि खुशीत असल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ खेळाडू आणि त्यांचा २५ वर्षीय प्रशिक्षक १७ दिवसांपासून बेपत्ता होते. ते गुहेत असल्याचे समजल्यावर शोध मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत घेण्यात आली. भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, ब्रिटेन आणि यूरोप आदी देशांनी मदत केली. त्यानंतर गुहेतून १३ जणांच्या टीमला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.आधी फुटबॉल संघातील आठ जणांना गुहेतून बाहेर काढण्यात यश आले. या मुलांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.



दरम्यान या मुलांच्या नावांच्या बाबतीत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली  होती. जी मुलं अजूनही गुहेत अडकली आहेत त्यांचे पालक आणि बाहेर काढण्यात आलेल्या मुलांच्या पालकांमध्ये काही गैरसमज होऊ नये यासाठी यासाठी ही काळजी घेण्यात आली. पाणबुडीच्या मदतीने उर्वरीत चार खेळाडू आणि एका प्रशिक्षकला गुहेमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. या बचाव पथकाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागले होते.


शनिवारी गुहेत खेळाडू अडकलेत...


चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघ १७  दिवसांपासून बेपत्ता होता. या संघाचा काहीही पत्ता लागलेला नव्हता. थायलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या थाम लुआंह नांग नोन गुहेमध्ये गेल्या शनिवारी थायलंडच्या किशोरवयीन फुटबॉल संघातील ११ ते १६ वर्ष वयोगटातील १२ खेळाडू आणि २५ वर्षीय प्रशिक्षक बेपत्ता झाले होते.


चियांग राय प्रांतात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे भू-स्खलनामुळे गुहेमध्ये हा संघ अडकला. शनिवारी गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ संघातील खेळाडूंच्या सायकल, बूट आणि इतर साहित्य सापडले होते. फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे एक पथक गुहेमध्ये उतरले. परंतु चार दिवसानंतरही त्यांचा शोध न लागल्याने चिंता व्यक्त केली जात होती.


बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड पावसामुळे गुहेमध्ये पाणी शिरल्याने जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शोध मोहिमेत अडचण येत होती. तसेच गुहेमध्ये काही भागामध्ये ऑक्सिजनचीही कमतरता असल्याने बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागला होता.