गुहेत बेपत्ता झालेली फुटबॉल टीम सापडली, पण...धोका कायम
गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा फुटबॉल संघाचा शोध पाणबुडीच्या माध्यमातून लागला. मात्र, गुहेत अद्याप पाणी असल्याने
बँकॉक : थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा संपूर्ण १२ किशोरवयीन फुटबॉल संघ आपल्या प्रशिक्षकासह बेपत्ता झाला होता. मात्र, या संघाचा शोध लागलाय. गेल्या आठवड्यापासून या संघाचा काहीही पत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, येथे मुसळधार पाऊस कोसळ्याने गुहेत पाणी शिरले. त्यामुळे बेपत्ता झालेल्या संघाचा शोध घेण्यात बाधा येत होता. शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु ठेवण्यात आले. नऊ दिवसानंतर फुटबॉल टीमचा शोध पाणबुडीच्या माध्यमातून लागला. मात्र, गुहेत अद्याप पाणी असल्याने आणि फुटबॉल संघातील सदस्यांना पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर काढणे कठिण झालेय. दरम्यान, त्यांना गुहेत ऊर्जा मिळण्यासाठी खाद्य पदार्थ पुरविण्यात येत आहेत.
गुहेमध्ये अडकलेल्या थायलंडच्या संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघाचा शोध लागला असला तरी त्यांच्या बचावकार्यातील अडथळे येत आहेत. ११ वा दिवस उजाडला तरी हा संघ आणि प्रशिक्षक सारे गुहेतच अडकले आहेत. या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे धोक्याची धक्यता अधिक आहे. अरुंद वाट आणि त्यातही पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून बचाव पथकानं नवीन शक्कल लढवली आहे. मुले आणि प्रशिक्षकांना गुहेतच पोहोण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहावर मात करत अडकलेल्या संघाला बाहेर काढण्यास बचाव पथाकाला यश मिळेल.
या पथकाने मुलांशी व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे बुधवारी संवाद साधला आणि त्यांना पोहोण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी पाणबुडे, समूपदेशक व नेवी सील्स हे सर्व उपस्थित होते. या १३ जणांना औषधे व अन्न पुरवत आहेत. गुहा अरुंद असून जोरदार पाण्याचा प्रवाह खूपच जास्त असल्यामुळे काम खूपच कठीण झाले आहे. पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत. मंगळवार उशिरापर्यंत १२० दशलक्ष लिटर पाणी पंपाद्वारे बाहेर काढण्यात आलं आहे.
पावसाची अनिश्चिता, बदलणारं हवामान याचा अंदाज घेत बचाव पथक काम सुरु आहे. मात्र, ३० पाणबुडे असलेली एक टीम तयार करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर एक व्हिडीओ प्रकाशित केला गेला. दरम्यान, मुलं अडकेल्या गुहेत पाईप द्वारे ऑक्सिजन सोडण्यात आला आहे. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाने पाणी उपसण्याचे काम सतत सुरू ठेवण्यात आले आहे.