ट्राफिक नियम पाळण्यासाठी... बॅले डान्सर रस्त्यावर
आपली कला लोकांपर्यंत आणण्यासाठीही हा पर्याय चांगला आहे, असं काही डान्सर्सना वाटतं
मुंबई : ट्राफिक नियम पाळण्यासाठी ट्राफिक पोलीस, फलक लोकांना आवाहन करताना दिसतात. परंतु, मॅक्सिकोमध्ये मात्र ट्राफिकच्या नियमांचं पालन करण्यासाठी चक्क बॅले डान्सर्स रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळत आहेत. इथं प्रत्येक विकेन्डला ट्राफिक सिग्नलसमोर बॅले डान्सर्स डान्स करताना दिसतात.
मॅक्सिकोमध्ये बऱ्याचदा ट्राफिक आढळतं... लोकांना खूप सारा वेळ ट्राफिकमध्येच काढावा लागतो. त्यामुळे अनेकदा ट्राफिक नियमांना फाटा देण्याचा लोकांचा प्रयत्न असतो.
परंतु, लोकांना ट्राफिक नियम तोडू नयेत आणि सिग्नलला ते कंटाळू नयेत यासाठी सिग्नल लाल रंगाचा झाल्याझाल्या बॅले डान्सर्स रस्त्यावर उतरतात... आणि डान्स करू लागतात... पुन्हा सिग्नल हिरवा होईपर्यंत... आपली कला लोकांपर्यंत आणण्यासाठीही हा पर्याय चांगला आहे, असं काही डान्सर्सना वाटतं. बॅले डान्सर्सचा एक परफॉर्मन्स ५८ सेकंदांचा असतो.
या प्रयोगासाठी एका थिएटर कंपनीनं पुढाकार घेतलाय. परंतु, यामुळे वाहतुकीत अडकलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होतेय.