अफगाणिस्तान : 20 वर्षानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी राजवट सत्तेवर आली आहे. त्यामुळे अफगाणी नागरिक दहशतीत आहेत. पण या सत्तापालटाचा सर्वाधिक परिणाम होणाराय तो महिला आणि मुलांवर. कारण तिथं पुन्हा एकदा शरिया कायदा लागू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये रविवारी सत्ता हस्तगत केली. तालिबान्यांकडे देशाची सूत्रं गेल्यानंतर सर्वात पहिला बदल होणाराय तो अफगाणिस्तानच्या नावात. आता अफगाणिस्तानचं नामांतर 'इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान' असं केलं जाणार आहे.


1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. त्यावेळी अफगाणिस्तानचं नाव 'इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान' असं बदलण्यात आलं होतं. आता पुन्हा अफगाणिस्तान तालिबान्यांच्या कब्जात आल्यानं पुन्हा तेच नाव ठेवण्यात येणार आहे.


दरम्यान, या तख्तपालटाचा सर्वात गंभीर परिणाम भोगावा लागणार आहे तो अफगाणी महिला आणि युवा वर्गाला. कारण सप्टेंबर 2001 आधी तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानात इस्लामी शरिया कायदा लागू होता. आता नव्यानं शरिया कायदा लागू होणार असल्यानं महिला वर्गामध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. 


मात्र यावेळी महिलांना शिकण्यावर बंदी नसेल, अशी घोषणा तालिबाननी प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी केलीय. मात्र महिलांना हिजाब परिधान करावा लागेल. तसंच शरिया कायद्याचं काटेकोर पालन करावं लागेल, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे.


शरिया कायद्यातील या जुलमी आणि भयंकर तरतुदींमुळंच अफगाणी नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. तालिबान्यांच्या या जाचातून सुटका करून घेण्यासाठीच अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.