काबूल :  तालिबाननं पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. राजधानी काबुलमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचं सैन्य शिरलं आहे. अफगाणिस्तानात लोकशाहीचा पुरता पाडाव झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रपती अशरफ घनी (Asharaf ghani)  यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिलाय. तालिबानी फौजा राजधानी काबुलच्या वेशीवर उभ्या ठाकल्यात. तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्याची माहिती काही सरकारी अधिकाऱ्यांनीच जाहीर केलीय. अमेरिकेनं आपल्या वकिलातीतल्या स्टाफला अफगाणिस्तानबाहेर नेण्यास तातडीनं सुरूवात केलीय. अमेरिकन अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रंही जाळून टाकायला सुरूवात केलीय. (The whole of Afghanistan is under the control of the Taliban) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबाननं संपूर्ण काबुललाच वेढा दिल्याची स्थिती आहे. शनिवारी मजार ए शरीफ शहर तालिबानने जिंकलं. रविवारी सकाळी पाकिस्तानी सीमेजवळ असलेला जलालाबाद हा अफगाणिस्तानचा गडही ढासळला. आता अफगाणिस्तानच्या सर्वच सीमांवर तालिबानी अंकुश आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरील तोरखाम पोस्टही तालिबानने जिंकलीय. त्यामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानशी असलेल्या सर्व सीमा सील करून टाकल्या आहेत. 



मात्र आम्हाला काबुल बळाच्या जोरावर नाही तर चर्चेच्या माध्यमातून जिंकायचं आहे. त्यामुळं तालिबानी फौजा काबुलच्या वेशीवरच थांबल्याची माहिती तालिबानच्या मुख्य प्रवक्त्याने दिलीय. 


तालिबान वेशीवर असल्यामुळं आता काबुलमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. हजारो नागरिकांनी घरं सोडून सार्वजनिक ठिकाणी आश्रय घेतलाय. सर्वच बँकांनी कॅश फ्लो थांबवलाय. एटीएम यंत्रणा बंद झाल्यात. सरकारी अधिकारी, कर्मचारी पळून गेलेत. त्यामुळे वीज, पाणीही नाही अशी गोंधळाची स्थिती आहे. एकूणच अफगाणिस्तान पुन्हा संकटात सापडलाय. अत्याचाराचं, हिंसेचं, अपमानजनक जिण्याचं दुःस्वप्न अफगाणी जनतेच्या नशिबी आलंय.