लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेतलं हूजूर पक्षाचं बहुमत मजबूत करण्यासाठी घेतलेल्या मध्यावधी निवडणुकीचा निर्णय पक्षाच्या अंगाशी येण्याची भीती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत झालेल्या निकालमध्ये मजूर पक्षानं तब्बल 123 जागा जिंकल्या असून सत्ताधारी हूजूर पक्षाला 113 ठिकाणी यश मिळालंय. त्यामुळे नव्यानं अस्तित्वात येणारी लोकप्रतिनिधी सभा त्रिशंकू होण्याची शक्यता निर्माण झालीय.  


सध्या असणारं बहुमत हूजूर पक्ष गमावण्याची शक्यता एक्झिट पोलनीही वर्तवलीय. गुरुवारी संध्याकाळी मतदान संपल्यावर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या निकालांमध्ये हुजूर पक्षाला फक्त 314 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


ब्रिटीश संसदेच्या लोकप्रतिनिधी सभेत बहुमतासाठी 326 जागा जिंकणं आवश्यक असतं. सध्या हूजूर पक्षाकडे 331 जागा आहेत. ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीसाठी आणखी मजबूत बहुमत मिळावं या उद्देशानं ही मध्यावधी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.पण निवडणुकीचा मूळ उद्देशच जनतेनं नाकारल्याचं पुढे येतंय. दरम्यान गेल्या तीन महिन्यात ब्रिटनमध्ये झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांचाही या निकालांवर परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसतंय.