Laziest Citizen Contest: माणसाने सतत उत्साही असावं असं म्हणतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असंही सांगितलं जातं. कोणतीही स्पर्धा असली तरी आळशी लोक सामान्यपणे त्याकडे दूर्लक्षच करतात. मात्र स्पर्धाच आळशी लोकांसाठी भरवण्यात आली तर? या अजब स्पर्धेचे नियमही फार अजब आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धांनी जागेवर उभंही रहायचं नाही आणि बसायचंही नाही असं नियमांमध्ये म्हटलं आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांना केवळ लोळत राहायचं एवढं एकच टास्क आहे. आळशी लोक सतत लोळत पडलेले असतात असं म्हटलं जातं त्यामुळेच हेच टास्क देण्यात आलं आहे.


कुठे सुरु आहे ही स्पर्धा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळशी लोकांना जागेवरच खाणं, मोबाईल आणि इंटरनेट डेटा मिळाला तर अनेकजण लोळत आयुष्य काढतील असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अशाच आळशी लोकांना शोधण्याची स्पर्धा युरोपच्या अग्नेयकडे असलेल्या मोंटेनेग्रो देशात सुरु आहे. येथील ब्रेजना रिसॉर्टमध्ये दरवर्षी या अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेमध्ये आता केवळ 7 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेमधून 'सर्वात आळशी नागरिक' हा मानाचा पुरस्कार 7 जणांपैकी एकाला दिला जाणार आहे. आपण किती आळशी आहोत हे दाखवून देणाऱ्यांच्या या अजब स्पर्धेचे नियम जाणून घेऊयात....


उभं राहण्याची आणि बसण्याची परवानगी नाही


स्पर्धेच्या नियमानुसार, स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना उभं राहण्याची आणि बसण्याची परवानगी नाही. मात्र लोळत लोळत खाण्या-पिण्याची, पुस्तकं वाचण्याची आणि लॅपटॉप तसेच मोबाईल वापरण्याची परवानगी आहे. मात्र यापैकी काहीही करताना उठून बसण्याची किंवा उभं राहण्याची परवानगी नाही. स्पर्धकांना दर 8 तासांनी 10 मिनिटांचा बाथरुम ब्रेक मिळणार आहे.


21 स्पर्धकांपैकी 7 जणांमध्ये चुरस


एका वृत्तानुसार ही अजब स्पर्धा ऑगस्ट महिन्यादरम्यान सुरु झाली होती. सध्या या स्पर्धेला 26 दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. यामध्ये 21 स्पर्धकांपैकी 7 जण स्पर्धेत शिल्लक राहिले आहेत. हे सर्वजण सध्या 1070 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 88 हजार रुपयांच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसाठी स्पर्धा करत आहेत. लेझिएस्ट सिटीझन नावाच्या या स्पर्धेचं यंदा 12 वं पर्व सुरु आहे, असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.


26 दिवसांचा टप्पा ओलांडला


'द न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील वर्षी लोळण्याचा विक्रम 117 तासांचा होता. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा 26 दिवसांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. 2021 साली डबरावका अक्सिकने ही स्पर्धा जिंकलेली. "आम्हा सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. कोणालाही आरोग्यासंदर्भातील कोणतीही समस्या जाणवत नाही. आमची योग्य काळजी घेतली जात आहे. आम्हाला केवळ लोळत राहायचं आहे," असं स्पर्धेत साहभागी झालेल्या डबरावकाने म्हटलं आहे.


कशी सुरु झाली ही स्पर्धा?


स्पर्धेचे आयोजक आणि मालिक रेडोंजा ब्लागोजेविक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा 12 वर्षांपूर्वी मस्करीमध्ये सुरु करम्यात आली होती. मोंटेनेग्रो देशातील लोक आळशी आहेत असं म्हटलं जायचं. त्यावरुनच ही कल्पना सुचल्याचं ब्लागोजेविक यांनी सांगितलं. या स्पर्धेमध्ये सुरुवातीला 21 स्पर्धक होते. आता केवळ 7 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. हे 7 लोक मागील 463 तासांपासून लोळत आहेत. मेपल झाडांच्या वनात या स्पर्धकांना लोळत राहण्यासाठी विशेष जागा करुन देण्यात आली होती. मात्र हवामानातील बदलांमुळे या सर्वांना एका लाकडाच्या झोपडीमध्ये हलवण्यात आलं आहे.