चीनमध्ये बाटलीतून का विकली जातेय वाघाची लघवी? आहे प्रचंड मागणी, वापर पाहून वाटेल किळस
![चीनमध्ये बाटलीतून का विकली जातेय वाघाची लघवी? आहे प्रचंड मागणी, वापर पाहून वाटेल किळस चीनमध्ये बाटलीतून का विकली जातेय वाघाची लघवी? आहे प्रचंड मागणी, वापर पाहून वाटेल किळस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2025/01/28/838650-tigernwurine.png?itok=4IeIUhl3)
Weird News : चित्रविचित्र प्रकरणांसाठी चीन कायमच चर्चेचा विषय ठरतो. अशा या देशात आता नेमकं काय सुरुय माहितीये? वाचून तुम्हाला किळस वाटेल...
Weird News : चीन म्हटलं की तिथं असणाऱ्या खाद्यसंस्कृतीपासून तेथील अनेक चालीरिती आणि तत्सम गोष्टची कायमच साऱ्या जगाचं लक्ष वेधत असतात. आताही याच चीननं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. यावेळी कारण ठरतेय ती म्हणजे या देशात सुरू असणारी एका विचित्र गोष्टीची विक्री. सहसा किडेमुंग्या, विंचू अशा गोष्टी स्नॅक्स म्हणून विकणाऱ्या चीननं यावेळी चक्क वाघाची लघवी विकत साऱ्या जगाच्या भुवया उंचावल्या आहेत.
सहसा एखादं आजारपण आलं की अनेकांचेच पाय डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञांकडे वळतात. पण, चीनमध्ये मात्र संधीवातासारख्या शारीरिक व्याधीसाठी वैद्यकिय उपचार घेण्याऐवजी स्थानिक थेट प्राणीसंग्रहालय गाठत आहेत. 'रूमेटिक आर्थराइटिस'वर उपचार करण्यासाठी इथं चक्क वाघाच्या लघवीचा वापर केला जात आहे. याच कारणास्तव चीनमधील बाजार आणि प्राणी संग्रहालयांमधील काऊंटरवर चांगल्या किमतीला वाघाच्या लघवीची विक्री होत असून, याला प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे.
दक्षिण पश्चिम चीनमध्ये असणाऱ्या सिचुआन प्रांतातील एका प्राणीसंग्रहालयात वाघाच्या लघवीचा वापर संधीवातावरील उपाय म्हणून केला जात आहे. याआन बिफेंगक्सिया वाइल्डलाइफ जू नावाच्या या प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना हे अजब Product विकलं जात आहे. वाघाच्या लघवीमुळं संधीवात, मांसपेशींमधील वेदना अशा शारीरिक व्याधी दूर होऊन बऱ्याच अंशी आराम मिळतो असा दावा इथं केला जात आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार इथं एका बाटलीमध्ये वाघाची लघवी 50 युआन (साधारण 600 रुपये) इतक्या किमतीला विकली जात आहे. इतकंच नव्हे, तर या लघवीचा औषध म्हणून नेमका कसा वापर करावा यासाठी या प्राणीसंग्रहालयानं काही मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी केल्या आहेत. कथित स्वरुपातील ही औषधवजा लधवी व्हाईट वाईन आणि आल्याच्या तुकड्यासह मिसळून वेदना असणाऱ्या भागावर लावण्याचा सल्ला चीनमध्ये दिला जात आहे. ही लघवी औषध म्हणून प्राशनही करता येते असं सांगत कोणा एका व्यक्तीला कशाचीही अॅलर्जी असल्यास मात्र तिचं सेवन टाळावं अशा स्पष्ट सूचना प्राणीसंग्रहालयातून करण्यात आल्या आहेत.
हेसुद्धा वाचा : हुर्रेsss; आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच काम; नवा नियम लागू
चीनमध्ये अजब दावा करत विकल्या जाणाऱ्या वाघाच्या लघवीवरून आता मतमतांतरं पाहायला मिळत आहेत. इथं सिचुआन आणि संपूर्ण चीनमधील अनेक डॉक्टरांनी या प्रकरणी तीव्र विरोध दर्शवला असून, अशा प्रकारच्या अप्रमाणित उपचारांना वाव दिल्यास मोठा धोका उदभवू शकतो ही बाब प्रकर्षानं लक्षात आणून दिली आहे.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भ आणि स्थानिक वृत्तांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नाही.)