महागाईचा भडका! कांदे 400 रुपये तर टोमॅटो 500 रुपये किलो, जनता हतबल
महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, आर्थिक परिस्थिती बिकट
Tomato Price Hike: महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. महागाईने लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये भाजीपाल्याची किंमत तर गगनाला भिडली आहे. भाज्यांचे दर 400 ते 500 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत.
पाकिस्तानातल्या बलूचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे भाजीपाल्याची आयात जवळपास बंद झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. भाज्या खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.
भारताकडून करु शकतात आयात
भाजीपाल्याच्या कमतरेमुळे पाकिस्तान सरकार भारताकडून टोमॅटो आणि कांद्याची आयात करण्याचा प्लान आखतंय. जर असं झालं तर याचा थेट फायदा भारतातील शेतकऱ्यांना होऊ शकतो.
महागाईने कंबरडं मोडलं
रविवारी लाहोरमध्ये टोमॅटोचे दर 500 रुपये प्रति किलो इतका होता. तर कांद्याची किंमत 400 रुपये प्रतिकिलो इतकी पोहोचली आहे. याशिवाय इतर भाजीपाल्याची किंमतही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. येणाऱ्या काही दिवसात महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात टोमॅटो 700 प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता आहे. बटाटे 120 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
अनेक भाज्या झाल्या गायब
याशिवाय अनेक पालेभाज्या बाजारातून गायब झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकारला भारताकडून भाजीपाल्याची आयात करण्याचा पर्याय असू शकतो. इराण सरकारकडूनही मागणी करु शकतात.