प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा मग कुऱ्हाडीने..., सीरियल किलरकडून पत्नीसह 42 मुलींचा भयानक अंत
Crime News : तो मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा, नंतर संधी साधून त्यांची निघृण हत्या करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून द्यायचा. या राक्षसाने आतापर्यंत पत्नीसह 42 मुलींना भयानक अंत दिलाय.
Serial Killer : केनियामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एक सीरियल किलर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा...मग संधी साधून त्यांची कुऱ्हाडीने हत्या करुन त्यांना कचऱ्याचा ढिगाऱ्यात फेकून द्यायचा. त्या सीरियल किलरने आतापर्यंत पत्नीसह 42 महिलांचा नाहक बळी घेतला आहे. पोलिसांनी या सीरियल किलरला अटक केलीय. एका पडक्या खाणीत पोलिसांना अनेक मृतदेह सापडले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. केनिया पोलिसांनी 33 वर्षीय जोमाइस खालिसिया (Kenyan serial killer Jomaisi Khalisiya) याला अटक केलीय.
सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर केनिया शहरात एकच खळबळ माजली. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता आरोपी युरो फायनल पाहत होता. आरोपींनी खून करून मृतदेह राजधानी नैरोबीतील मुकुरू खाणीत फेकून दिला होता. आरोपीला गजाआड केल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मृतदेह येथून काढण्यात येत आहेत. हे पाहून जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये त्याचा विरोधात संताप आणि भीती पसरलीय. गुन्हे अन्वेषण संचालनालयाचे (डीसीआय) प्रमुख मोहम्मद अमीन यांनी आरोपींबाबत दुजोरा दिलीय.
कधीपासून सुरु आहे प्रकरण?
केनिया पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सांगितलं की, 2022 पासून तो महिलांची अशी निघृण हत्या करत आहेत. गेल्या गुरुवारपर्यंत त्याने 42 महिलांच्या हत्येची कबुली दिलीय. तो महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. त्यानंतर निर्घृण हत्या करून मृतदेह खाणीत फेकून द्यायचा. त्याला वाटले की तो कधीच पकडला जाणार नाही. आरोपीचे घर खाणीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होतं. पोलिसांनी आरोपींकडून 10 फोन, महिलांचे कपडे, लॅपटॉप आणि ओळखपत्रे जप्त केलंय. तो मृतदेह गोण्यांमध्ये भरून फेकून द्यायचा. पोलिसांनी आतापर्यंत 9 पोती जप्त केलीत.
धक्कादायक म्हणजे सर्वांची हत्या करण्याची पद्धत एक सारखीच होती. तर या 18 ते 30 वयोगटातील तरुणी होत्या. अनेक महिलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांनी मिळाले आहेत. मात्र हत्येमागे आरोपींचा हेतू काय होता? हे अद्याप कळू शकले नाही. जोसेफिन मुलोंगो ओविनो या महिलेची तिच्या मोबाइल फोनवरून ओळख पटली असल्याच पोलिसांनी सांगितलंय. महिलेने बेपत्ता झाल्याच्या दिवशी काही पैशांचे व्यवहार केला होता. याचा तपास पोलिसांनी केलाय. कार्यवाहक पोलीस प्रमुख डग्लस कान्झा म्हणाले की, या भागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. कारण तपासात कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. शिवाय या प्रकरणाचा तपास नवीन पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलाय.