`या` खिडकीनं थांबवली प्लेगची महामारी! आता पर्यटकांसाठी ठरते पर्वणी...
Travel News : एका खिडकीमुळं थांबवता आली प्लेगची महामारी; व्यवस्थित पाहा आणि जाणून घ्या या इवल्याश्या खिडकीची कमाल
Travel News : जगाच्या पाठीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला थक्क करुन सोडतात. मुळात जगण्याचं चक्र कधी ना कधी, कळत नकळत आपल्याला अशा एखाद्या वळणावर घेऊन येतं जे पाहताना आपण क्षणात भूतकाळात पोहोचतो. सहसा एखाध्या नव्या ठिकाणी भेट दिली असताना ही बाब लगेचच लक्षात येते. कोरोनाच्या महामारीचेच दिवस आठवा. पाहता पाहता जगभरात फैलाव झालेल्या या विषाणूच्या संसर्गामुळं इतकी वाईट वेळ आली, की दुसऱ्या व्यक्तीचं शेजारहून जाणं, स्पर्श करून घेणंही धोक्याचं वाटू लागलं होतं.
संपूर्ण जगावर आलेली ही वाईट वेळ, किंबहुना असा एखादा प्रसंग पहिल्यांदाच ओढावला होता असं नाही. कारण, साधारण 1634 च्या दशकांमध्ये इटलीतील फ्लोरेन्स शहरामध्ये प्लेगची महामारी आली आणि इथली परिस्थिती बदलली. इथंही काहीशी लॉकडाऊनसारखीच वेळ आली. मानवी संपर्त जाणीवपूर्वक टाळला जाऊ लागला. अशा परिस्थितीमध्ये विविध ठिकाणांवर व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट संपर्क येऊ नये यासाठी एक शक्कल लढवली आणि लहानशा खिडक्या तयार करण्यात आल्या. ज्यातून जेमतेम दुकानातील व्यक्तीचा हात बाहेर येऊन खाद्यपदार्थ, वाईन आणि तत्सम गोष्टी ग्राहकांना देता येतील, तेसुद्धा संपर्काशिवाय.
इवल्याश्या खिडक्यांची कमाल...
इटलीची Food City अशी ओळख असणाऱ्या फ्लोरन्स शहरात दारुच्या विक्रीसाठी एका अशा पद्धतीचा वापर केला ज्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसानही झालं नाही आणि शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा फैलावही झाला नाही.
या खिडक्या इतक्या खास का?
Florence wine windows किंवा फ्लोरेन्स शहरातील या खिडक्या त्यांच्या विशिष्ट आकारासाठी ओळखल्या जात होत्या. सहसा या खिडक्या इमारतीच्या एका बाजूला असत. इटालियन भाषेत Buchette del vino म्हणजेच 'वाईन विंडोज' असं संबोधलं जात होतं. 30 सेंटिमीटर उंच आणि 15 सेंटिमीटर रुंद असणाऱ्या या खिडक्यांतून एक हात बाहेर येऊन दुकानमालक, वाईन, खाद्य़पदार्थ ग्राहकांना देत होते.
हेसुद्धा वाचा : चालता चालता बंद पडतेय Honda ची नवीकोरी बाईक; कंपनीनं परत मागवले हजारो मॉडेल्स
आजच्या घडीला फ्लोरेन्समध्ये गतकाळातील याच खिडक्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. एकट्या फ्लोरेन्समध्ये सध्या 150 वाईन विंडोज असून, सध्या त्यांचा वापर मद्यविक्रीसाठी आणि पर्यटकांच्या आकर्षणासाठी केला जातो. फक्त फ्लोरेन्सच नव्हे टस्कनी आणि इटकीलीत इतर शहरांमध्येसुद्धा अशाच प्रकारच्या खिडक्या पाहायला मिळतात.