Video: सलग 12 दिवसापासून मेंढ्या धावताहेत रिंगणात! त्यांच्या कृतीने आश्चर्याचा धक्का
Shocking Video: मेंढ्याचं रिंगण एक गूढ असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. इतकेच नाही तर मेंढ्या एकामागोमाग न थांबता चालत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेल्या 12 दिवसांपासून मेंढ्या अशी कृती करत आहेत.
Sheep Walking In Circle For Twelve Days: आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. या पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या पालख्यांना विशेष मान असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाताना काटेवाडीत मेंढ्यांचं रिंगण होतं. काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी...पायघड्या धोतराच्या, झाला गजर हरिनामाचा! असं म्हणत संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाभोवती मेंढ्या रिंगण घालतात. आपल्यासाठी मेंढ्यांचं रिंगण काही नवीन नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून चीनमधील मेंढ्यांच्या रिंगणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मेंढ्या कायम सरळ चालतात आणि आपल्या पुढच्या मेंढीला फॉलो करतात. मात्र या मेंढ्या गेल्या 12 दिवसांपासून रिंगणात फिरत आहेत. हा व्हिडीओ पीपल्स डेली चायना नावाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मेंढ्यांचं रहस्य, उत्तर चीनच्या इनर मंगोलियामध्ये शेकडो मेंढ्या गेल्या 10 दिवसांपासून रिंगणात चालत आहेत. मेंढ्या व्यवस्थित असून त्या असं का करत आहेत याबाबत गूढ निर्माण झालं आहे.'
मेंढ्या रिंगणात फिरत आहेत
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोन दिवस झाले तरी मेंढ्या चालत आहेत. म्हणजे जवळपासा 12 दिवसांपासून मेंढ्या रिंगणात चालत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मेंढपालांनाही मेंढ्या असं का वागत आहेत? असा प्रश्न पडला आहे. सुरुवातीला काही मेंढ्या रिंगणात चालत होत्या. त्यानंतर मेंढ्यांचा कळप अशी कृती करू लागला. त्यांच्या कृतीने प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला आहे. मेंढ्यांचा फोटो आणि व्हिडीओ पाहून वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. काही मेंढ्या रिंगणात शांत उभ्या आहेत आणि बाकी त्यांच्याभोवती फिरत आहेत.
बातमी वाचा- बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत 'आईचं दूध'! जाणून घ्या यामागचं कारण
मेंढ्यांनी काहीच खाल्लेलं नाही
आश्चर्यकारक बाब म्हणजे त्या मेंढ्यानी अजून काहीच खाल्लेलं नाही. तरी त्यांची प्रकृती एकदम ठिक आहे. वैज्ञानिकांच्या मते, लिस्टेरियोसिस नावाच्या जीवाणूमुळे त्या अशा करत असाव्यात. हा जीवाणूमुळे मेंढ्यांच्या मेंदूवर परिणाम करतो आणि सूज येते. त्यामुळे त्यांचं शरीर लकवाग्रस्त होतं आणि त्यामुळे त्या असं करत असाव्यात, असं सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही मेंढ्या रिंगणात फिरत असल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.