नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जोरदार झटका दिलाय. निर्यात व्यापारात भारताला अमेरिकेकडून मिळत असणारी सूट रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं जाहीर केलाय. ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेसला भारतासोबत 'जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रिफरन्सेस' (जीएसपी) रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांना चिठ्ठी लिहून त्यांनी अमेरिका भारताचा कर्ज मुक्त देशाचा दर्जा संपवण्याचा निर्णय घेत असल्याचं कळवलंय. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर लागणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासह तुर्कस्तानलाही अमेरिकेने करमुक्त देशांच्या यादीतून बाहेर काढलंय. भारतातल्या बाजारपेठेत अमेरिकेला न्यायसंगत आणि योग्य भागीदारी देण्यात भारत अपयशी झाल्याची टीका ट्रम्प यांनी केलीय. यापूर्वी ट्रम्प यांनी शनिवारी भारत हा 'सर्वात जास्त कर वसूल करणारा देश' असल्याचं म्हटलं होतं. सोबतच अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर समान किंवा किमान काहीतरी शुल्क लावण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. 


गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि चीन दरम्यान 'ट्रेड वॉर' सुरू आहे. या दरम्यान, 'भारत हा सर्वात जास्त कर वसूल करणारा देश आहे. ते आमच्याकडून खूप कर वसूल करतात... भारत हा केवळ उदाहरणादाखल देत आहोत, त्यातून इतर देशही अमेरिकन वस्तूंवर कशाप्रकारे कर वसूल करतात हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे' असं म्हणत शनिवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच इतर राष्ट्रांनाही इशारा दिला होता.  


यावेळी त्यांनी हार्ले - डेव्हिडसन या बाईकचं उदाहरणही दिलं. 'जेव्हा आम्ही भारताला मोटारसायकल पाठवतो तेव्हा त्यावर १०० टक्के कर वसूल केला जातो. ते आमच्याकडून १०० टक्के शुल्क घेतात. परंतु, जेव्हा भारत आमच्याकडे मोटारसायकल निर्यात करतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा कर घेत नाहीत. त्यामुळेच आम्ही या व्यवहारात समान किंवा किमान कर लावण्याचा निर्णय घेतलाय' असं त्यांनी स्पष्ट केलं.