Turkey Syria Earthquake: भारताने पुढे केला मदतीचा हात! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
Turkey Syria Earthquake India extends help: पंतप्रधान मोदींनी बंगळुरुमधील एका कार्यक्रमामध्ये या भूकंपाच्या घटनेचा उल्लेख करत झालेल्या जिवतीहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
Turkey-Syria Earthquake: तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपामुळे जगभरामध्ये खळबळ उडाली आहे. तुर्कीमधील भूकंपामध्ये आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. मृतांशी संख्या वाढण्याची शक्यता आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपानंतर (Turkey-Syria Earthquake) अजूनही अनेक लोक बेपत्ता असून हजारोंच्या संख्येनं लोक जखमी तसेच बेघर झाले आहेत. भूकंपाचा फटका बसलेल्या तुर्की आणि सीरियाला मदत करण्यासाठी आता भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाची बैठक
पंतप्रधान कार्यालयाच्या नेृत्वाखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये तुर्कीला मदत करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. तुर्की सरकारबरोबर समन्वय साधून एनडीआरएफ आणि वैद्यकीय तुकड्या भारतातून तुर्कीला पाठवण्यात येणार आहे.
भारताने काय मदत पाठवली
स्पेशल रेस्क्यू टीममध्ये प्रशिक्षित डॉग स्कॉडबरोबरच महत्त्वाच्या उपकारणांबरोबर 100 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठवण्यात येणार आहेत. आवश्यक औषधांबरोबरच प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेल्या मेडिकल टीमही तुर्कीला पाठवण्यात येणार आहेत.
मोदींनी व्यक्त केला खेद
बेंगळुरुमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मोदींनी तुर्कीमधील भूकंपाचा उल्लेख केला. त्यांनी तुर्कीमध्ये झालेला मोठा भूकंप आपण पाहत आहोत, असं म्हणत मोदींनी या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात खेद व्यक्त केला आहे. "तुर्कीच्या आजूबाजूच्या देशांनाही मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. भारतामधील 140 कोटी लोकांची सहानुभूति सर्व भूकंप प्रभावित लोकांबरोबर आहे," असं मोदी म्हणाले. याशिवाय पंतप्रधान मोदींनी भूकंप प्रभावित लोकांना शक्य ती मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचं म्हटलं आहे.
रशियाने पुढे केला मदतीचा हात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी सीरिया आणि तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपानंतर मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशांमध्ये 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांचे रशियाशी चांगले संबंध आहे. तर दक्षिण तुर्कीमध्ये भीषण भूकंपनानंतर प्रभावित प्रांतामध्ये मदत पोहचवण्यासाठी तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने एअर फोर्सच्या बचाव तुकड्यांसाठी विशेष एअर कॉरिडोअर बनवला आहे. तुर्कीने आपल्या विमानांमध्ये मेडिकल टीम, अडकलेल्या लोकांचा शोध घेणाऱ्या तुकड्या, बचाव दलांबरोबरच वाहनांचा समावेश आहे.
2 हजार 818 इमारतींची पडझड
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 हजार 470 जणांची सुटका करण्यात आली असून देशामध्ये एकूण 2 हजार 818 इमारतींची पडझड झाली आहे. अडकलेल्या लोकांना पडझड झालेल्या इमारतींच्या ढीगाऱ्यांखालून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.