लंडन: ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील ६५० जागांपैकी ३२६ जागांवर हुजूर पक्षाला विजय मिळाल्याचे वृत्त 'बीबीसी'ने दिले आहे. यापूर्वी एक्झिट पोल्सनी बोरिस जॉन्सन यांच्या मोठ्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. १९८७ नंतर हुजूर पक्षाला प्रथमच इतका मोठा विजय मिळाला आहे. थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जुलै महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर बोरिस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले की, ब्रिटनच्या लोकांनी आम्हाला तगडे जनमत दिले आहे. हे जनमत देश एकसंध ठेवण्यासाठी आणि ब्रेक्झिट अंमलात आणण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. 




दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोरिस जॉन्सन यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. बहुमताने विजयी झाल्याबद्दल मी बोरिस जॉन्सन यांचे अभिनंदन करतो. भारत आणि ब्रिटनमधील संबंध आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करु, अशी आशाही यावेळी मोदींनी व्यक्त केली.


नियोजित वेळापत्रकानुसार ब्रिटनमध्ये २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, ब्रेक्झिट करारावरून सुरु असलेल्या घडामोडींमुळे मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ ओढावली. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता.