मुंबई : युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. परिणामी या दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील लोक देखील युद्धाला तयार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. ज्यामुळे युक्रेनचे बरेच नुकसान झाले आहे. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु आता फिजिकल युद्धच नाही, तर रशियाने आता युक्रेनवर सायबर हल्ला करण्याचे देखील ठरवले आहे. आता रशियाने युक्रेनच्या एका महत्त्वाच्या अधिकृत वेबसाइटला टार्गेट केलं आहे.


अहवालानुसार, युक्रेनच्या अनेक मंत्र्यांच्या वेबसाइट्सना टार्गेट करून त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. अहवालानुसार, युक्रेनमधील शेकडो संगणकांमध्ये डेटा-वाइपिंग टूल सापडले आहे. हा सायबर हल्ला रशियाकडून केला जात असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.


यामध्ये असे ही सांगितले जात आहे की, रशिया युक्रेनमध्ये शक्तिशाली मालवेअर पसरवत आहे. CNN ने सायबर सिक्युरिटी फर्म मँडियनचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी चार्ल्स कारमाकल यांच्या हवाल्याने ही माहिती दिली.


या हॅकिंगबाबात युक्रेन सरकारकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. पण, सायबर हल्ला हा या मोहिमेचा एक भाग आहे आणि त्यांनी याद्वारे किमान एक वित्तीय संस्था आणि युक्रेन सरकारला टार्गेट केलं आहे.


पूर्वीपासूनच युक्रेनवर असे सायबर हल्ले सातत्याने होत आहेत. अमेरिका यासाठी रशियाला दोष देत आहे, तर रशिया नेहमीच अमेरिकेचे हे दावे फेटाळत आहे. अहवालानुसार, या सायबर हल्ल्यांना रशियाची लष्करी गुप्तचर यंत्रणा जबाबदार असल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.


डेटा-वाइपिंग टूल्सबद्दल बोलायचे तर, हा व्हायपर मालवेअर आहे. हा एक असा मालवेअर आहे, जो PC वरून फाइल्स हटवू शकतो. युक्रेनमधील मोठ्या संस्थांना या मालवेअरने टार्गेट केले असल्याचे बोलले जात आहे. हे हॅकिंग टूल केवळ दोन महिन्यात बनवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.