इराणमध्ये युक्रेनचं विमान पडलं की पाडलं?, इतर देशांकडून संशय व्यक्त
इराणमध्ये युक्रेनियन विमानाच्या अपघातावर संशयाचे ढग
नवी दिल्ली : इराणमध्ये युक्रेनियन विमानाच्या अपघातावर संशयाचे ढग जमा झाले आहेत. खुद्द इराणच्याच क्षेपणास्त्रानं हे विमान पाडल्याचा संशय पाश्चिमात्य देशांनी व्यक्त केला आहे. आता इराण किती पारदर्शक तपास करतो ते पाहायचं आहे. बुधवारी अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला असताना युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान तेहरानजवळ कोसळलं होतं. ज्यामध्ये विमानातले सर्व १७८ प्रवासी मारले गेले. इराणच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं विमानामध्ये अज्ञात तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सांगितलं होतं. मात्र आता या अपघाताविषयी शंका व्यक्त केली जाते आहे.
विमान उड्डाणाच्या काही तास आधीच इराकमधील अमेरिकन तळांवर इराणनं क्षेपणास्त्र डागली होती. आता तर हे विमानही इराणच्या क्षेपणास्त्रांमुळेच पडल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. युक्रेननं या अपघाताची चौकशी सुरू केली असून चार शक्यतांवर तपास सुरू आहे.
एकतर विमानात खरंच तांत्रिक बिघाड झालेला असू शकतो. इराणच्या मिसाईलमुळे विमान पडलेलं असू शकतो. विमानाची हवेमध्ये कुणाशी टक्कर झाली का, अशीही शंका आहे. तर अतिरेक्यांनी विमान हायजॅक करून पाडलंय का, याचाही तपास केला जाणार आहे.
अपघातस्थळाची रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रांचे अवशेष मिळतात का, हे युक्रेनला तपासायचं आहे. त्यासाठी त्या जागेची पाहणी करू द्यावी, अशी मागणी इराणकडे करण्यात आली आहे. याला इराणनं प्रतिसाद दिला नसला तरी विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यामध्ये अपघातापूर्वी कॉकपिटमधलं संभाषण रेकॉर्ड झालेलं असू शकतं. ब्लॅक बॉक्ससह अपघाताशी संबंधित इतर तपासासाठी सहकार्य करण्याची तयारी फ्रान्सनं दाखवली आहे.
इराणनं याला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी अद्याप युक्रेनला क्रॅश साईटची तपासणी करू देण्याबाबत मात्र मौन बाळगलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणनं गैरसमजातून विमान पाडलेलं असू शकतं, अशी शक्यता बोलून दाखवली.
इराणनं सुरूवातीला अमेरिकेकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करून पाहिला. ती शक्यता दिसत नसल्यामुळे तांत्रिक बिघाडाचं कारण पुढे केलं. मात्र आता युरोप-अमेरिकेनं इराणमुळेच विमान पडल्याची शक्यता वर्तवली आहे. हे सिद्ध झालं तर पाश्चिमात्य देशांविरोधात इराणनं उघडलेल्या मोहिमेला खिळ बसू शकेल.