वॉशिंग्टन : जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला युनायटेड नेशन्सनी मोठा दणका दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएनमध्ये भारतासह 128 देशांनी अमेरिकेच्या विरोधात मतदान केलं. जेरुसलेमला राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाबाबत भारतानं पहिल्यापासून आपलं मौन कायम ठेवलं होतं. या मतदानातून भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलीय. 


जेरुसलेमला राजधानी करण्याच्या निर्णयाविरोधात टर्कीनं युएनमध्ये प्रस्ताव मांडला होता. एकूण 128 देशांनी या प्रस्तावाच्या बाजूनं आणि अर्थातच अमेरिकेच्या विरोधात मतदान केलं. अमेरिकेच्या बाजूनं केवळ 9 देश होते. तर 35 देशांनी मतदान प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. 


जे देश याला विरोध करतील त्यांची मदत रोखली जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र त्याला न जुमानता अमेरिकेच्या या निर्णयाला सर्व देशांनी एकमतानं विरोध कायम ठेवला. मात्र तेल अव्हिवमधला दूतावास जेरुसलेमला हलवण्याच्या निर्णयावर अमेरिका अजूनही ठाम आहे.