UN lists Abdul Rehman Makki as a global terrorist: पाकिस्तानमधील दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rehman Makki) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) जागतिक दहशतवाद्यांच्या (Global Terrorist) यादीत समावेश केला आहे. सोमवारी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार मागील वर्षी जून महिन्यामध्ये चीनने मक्कीला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर विरोध केला होता. मात्र आता मक्कीला दहशतवादी घोषित करणं हा भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्राने (United Nations) आपल्या पत्रकामध्ये 16 जानेवारी 2023 रोजी सुरक्षा परिषद समितीने आईएसआयएल, अल-कायदा आणि संबंधित व्यक्तींबद्दलच्या प्रस्तावांवर 1267 (1999), 1989 (2011) आणि 2253 (2015) नुसार दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे.


मक्की काय काम करतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मक्की एक धोकादायक दहशतवादी असून तो खास करुन जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवादी कारवायांसाठी पैसे जमा करण्याचं काम करतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी तरुणांना दहशतवादी म्हणून प्रशिक्षण देणं, हल्ल्यांचं नियोजन करणं, तरुणांच्या डोक्यात टोकाचा द्वेष निर्माण होईल यासंदर्भातील मोहिमा राबवण्याची कामंही मक्की करतो.


हाफिजचा साडू


मक्कीला आधी भारत आणि अमेरिकेकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसेच मक्की लष्कर-ए-तोयबा (एलईटी) प्रमुख आणि 26/11 चा मोऱ्हक्या असलेल्या हाफिज सईदचा (Hafiz Saeed) साडूही आहे. दहशतवादी संघटनेमध्ये वेगवेगळ्या कामांबरोबरच तो अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत आहे.


यापूर्वीही ठरला आहे दोषी


अमेरिकी परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये एक पाकिस्तानी दहशतवादी विरोधी न्यायालयामध्ये दहशतव्यांना आर्थसहाय्य केल्याच्या प्रकरणामध्ये मक्कीला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. चीनने यापूर्वी अनेकदा पाकिस्तानामधील दहशतवाद्यांविरोधात मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावांना विरोध केला आहे. मात्र यंदा चीनने पाकिस्तानची साथ सोडल्याने मक्कीला दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे.


हे ही वाचा >> "भारताविरोधात तीन युद्धं लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान


काय परिणाम होणार


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीअंतर्गत मक्कीचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे प्रस्ताव मागील वर्षी जूनमध्ये मांडला होता. या प्रस्तावाला चीनने ऐनवेळी विरोध केला होता. चीनने नेहमीच भारताने मिक्कीला दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावात आडकाठी आणली आहे. मात्र यंदा चीनने असं काहीही केलं नाही. त्यामुळेच हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. मक्कीला दहशतवादी घोषित करण्यात आल्याने त्याच्यावर अनेक देशांमध्ये प्रवासबंदी, आर्थिक निर्बंध आणि इतर अनेक निर्बंध लादले जाणार आहेत.