लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही COVID-19 ची लागण झाली आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मला ताप आणि खोकला असल्यामुळे मी करोनाची चाचणी करून घेतली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे जॉन्सन यांनी ट्विटमध्ये म्हटले.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे बोरिस जॉन्सन त्यांच्या घरी सेल्फ आयसोलेट झाले आहेत. कालपासून माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे मी COVID-19 ची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मी सध्या घरूनच व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे काम करत आहे. आपण एकत्र मिळून कोरोनाला हरवू, असे जॉन्सन यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते. त्याचवेळी बकिंगहम पॅलेसमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे राजघराण्यातील इतर व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. 

युरोपमध्ये कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. स्पेन आणि इटली या देशांमध्ये बळींची संख्या चीनपेक्षाही जास्त आहे. याशिवाय, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.