दोहा: तालिबान आणि अमेरिका यांच्यात १८ वर्ष सुरू असलेल्या युद्धाचा शेवट दृष्टीपथात आला आहे. अमेरिका १४ महिन्यांत टप्प्याटप्प्याने सैनिक माघारी बोलावणार आहे.कतारची राजधानी दोहामध्ये तालिबानी प्रतिनिधी, अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकन परराष्ट्र सचिव माईक पोम्पोओ यांनी करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेत २०२० मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जातो आहे.यावेळी अफगाण राष्ट्रपती हामीद करझाई यांनी पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याचा पुनरुच्चार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करार झाल्यानंतर पहिल्या १३५ दिवसांत अमेरिका आणि इतर देश आपल्या ८ हजार ६०० सैनिकांना माघारी बोलावतील. त्यानंतर पुढील १४ महिन्यांत सर्व अमेरिकी सैनिक मायदेशी परततील.



अमेरिका आणि अफगाणिस्तान या दोघांनी भारताला या करारावेळी साक्षीदार म्हणून बोलावले होते. यावेळी एकूण २१ देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला दोहामध्ये झालेल्या शांतीकराराच्या वेळी हजर होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. अमेरिकन फौजांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबान सशस्त्र संघर्ष सोडून देईल, असे या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 



अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य निघून जाणे ही भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया १४ महिने चालणार आहे. त्यामुळे आगामी काळात भारत आणि तालिबानी शासक यांच्यात कसे संबंध तयार होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यावर एकूण दक्षिण आशियातील शांतता अवलंबून असेल.