वॉशिंग्टन : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी आणि चीनने भारताला आणि पाकिस्तानला संयमाचा इशारा दिला असला अमेरिकेने मात्र पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी अड्ड्यांवर तातडीने कारवाई कऱण्याची तंबी पुन्हा एकदा दिली आहे. अमेरिकन लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख जनरल जोसेफ डनफर्ड यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख जनरल झुबेर मोहम्मद हयात यांच्याशी भारताच्या हवाई हल्ल्यानंतर फोनवरून संपर्क साधला. याआधी देखील अमेरिकेने पाकिस्तानला दम दिला होता. पण पाकिस्तानकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने देखील दहशतवादी तळांवर तात्काळ कारवाई करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करावी असं ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी हा सल्ला दिला आहे.


पाकिस्तान हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांबाबत आणि जैश या संघटनेवरही पाकिस्तानने कारवाई करायला हवी. कारण त्यांनी पुलावामा येथील १४ फेब्रुवारीच्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना सोडता कामा नये. तसेच मुलतत्ववादी गटांना पाकिस्तानने आपल्या हद्दीत थारा देऊ नये, असेही पायन यांनी पाकिस्तानला बजावले आहे.


गेल्या वर्षी एफ. ए.टी.एफ.ने पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले आहे. मात्र त्यानंतरही आयसीस, अल कायदा, जामात उद दवा, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि तालिबान या अतिरेकी संघटनांना रोखण्यासाठी पाकिस्तानने काहीही केले नसल्याचं संस्थेनं म्हटले आहे. याबाबतची कार्यवाही मे २०१९पर्यंत पूर्ण करावी, असंही एफ.ए.टी.एफ.ने पाकिस्तानला बजावले आहे.