वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी, 2020च्या शेवटापर्यंत कोरोना व्हायरसवर लस तयार करु शकत असल्याचा दावा केला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत पाहायला मिळतोय. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकाकडे कोरोनावरील लस असेल असा दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनावर अनेक देशांकडून लस तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. AFP न्यूजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, 2020 हे वर्ष संपता-संपता आम्ही कोरोनावरील लस तयार करु असं, डोनाल्ड ट्रन्प यांनी सांगितंलय. लस तयार करण्यात, इतर कोणत्याही दुसऱ्या देशाने अमेरिकी संशोधक आणि रिसर्चला मागे टाकल्यास मला त्याची चिंता नसून, कोरोनावर केवळ प्रभावी लस सापडणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.



दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिल रोजी जगभरात 2 लाख 30 हजारांहून अधिकांचा बळी घेणारा आणि संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून झाली असल्याचा दावा केला होता.


कोरोना व्हायरसपुढे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही हतबल झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत 11 लाख 88 हजार 122 लोक कोरोनाबाधित आहेत. तर अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 68 हजार 263 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 78 हजार 263 लोक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आहे.