अफगाणिस्तान : क्रूरकर्मा तालिबान्यांनी केवळ अफगाण सरकारलाच गुडघे टेकायला लावले नाहीत. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही नाक घासायला लावलं आहे. स्वतःच्याच नागरिकांना वाचवण्यासाठी, त्यांना मायदेशी नेण्यासाठी तालिबान्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ अमेरिका आणि ब्रिटनसारख्या महासत्तांवर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूलच्या अमेरिकन दुतावासातून अमेरिकन झेंडा हटवण्यात आला आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नेण्याची तयारी सुरूय. त्यासाठी 1 हजार अमेरिकन सैनिकांना तातडीनं अफगाणिस्तानात पाठवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळून गेले. त्यामुळं जो बायडन सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठली आहे. ही केवळ अफगाणिस्तानची नव्हे, तर अमेरिकेचीही हार असल्याचं मानलं जातं आहे. 



अफगाणिस्तानात अमेरिकेचे तब्बल 3 लाख सैनिक होते. परंतु केवळ 80 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला. कोणतीही लढाई न करताच अमेरिकेनं आत्मसमर्पण केल्याची टीका आता अमेरिकेवर होत आहे. तालिबान्यांशी दोहा करार करून अफगाणिस्तान सोडणं ही अमेरिकेची चूक होती, असा भडीमार ब्रिटीश संरक्षणमंत्री बेन वालेस यांनी केलाय. 


तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट बायडन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तान युद्धावर अब्जावधी रूपये खर्च करून आणि सैनिकांचा जीव घालवून अमेरिकेनं खरंच काय मिळवलं, हा मोठा प्रश्नच आहे.