वॉशिंग्टन : अमेरिकेत हिंसक आंदोलनानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर संतापात अधिक भर पडली. एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झालेत. अमेरिकेच्या २४ राज्यात हिंसक आंदोलने सुरु आहेत. हे आंदोलन रोखण्यासाठी अमेरिकेत ७ जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मिनियापोलीस येथे मागील सोमवारी जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीचा श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याच्या बळजबरीमुळे घुसमटून मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत, असे म्हणत आंदोलक आक्रमक झालेत. त्यानंतर शुक्रवारपासून अमेरिकेत हिंसाचार उफाळला आहे. फ्लॉईड यांच्या हत्येच्या निषेधार्थ अमेरिकेतील हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, जाळपोळ, लूटमार, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. 



या आंदोलनानंतर अमेरिकेतील २४ राज्यात जवळपास १७ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस अश्रूधूराचा, रबरी गोळ्यांचा वापर करीत आहेत. आंदोलकांच्या गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. दरम्यान, वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अमेरिकेने माफी मागितली आहे.



महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंठकांकडून विटंबना करण्यात आली आहे, ही अतिशय दु:खद घटना आहे. आम्ही याबाबत खेद व्यक्त करतो. तसेच या प्रकरणी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदुत केन जस्टर यांनी दिली. दरम्यान, अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचारावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षे डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ज्या ठिकाणी विरोधकांची सत्ता आहे, त्याच ठिकाणी अधिक हिंसाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.