रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते. 


भेटीत नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचं स्वागत केलं. येथे दोघांमध्ये जवळपास 4 तास बैठक सुरु होती. किम जोंग उन आपल्या ट्रेनने रशियात दाखल झाले होते. 


व्लादिमिर पुतीन आणि किम जोंग उन यांनी बुधवारी प्रक्षेपण तळांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये चार ते पाच तास द्विपक्षीय चर्चा झाली. पुतिन यांनी बैठकीनंतर संवाद साधताना, रशिया सॅटेलाइट निर्मितीत उत्तर कोरियाला सहकार्य करेल अशी माहिती दिली. पुतिन यांनी यासाठीच आपण इथे आलो असल्याचं सांगितलं. दरम्यान, पुतिन यांनी यादरम्यान दोन्ही देशात सैन्य सहकार्यावर चर्चा झाल्याचे अनेक संकेत दिले. 


अमेरिकेचा संताप


पुतिन आणि किम जोंग उन यांच्यात झालेल्या भेटीने अमेरिकेची चिंता वाढवली आहे. याचं कारण या भेटीनंतर अमेरिकेकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इशारा देताना म्हटलं आहे की, जर रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात शस्त्रकरार झाला तर अमेरिका दोन्ही देशांवर निर्बंध वाढवताना अजिबात विचार करणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मॅथ्यू मिलर यांनी, दोन्ही देशांमध्ये झालेला करार हा युएनएससीच्या प्रस्तावाचं उल्लंघन असेल असं सांगितलं आहे. 


'रशियाला हवी आहे मदत'


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मिलर यांनी दावा केला आहे की, रशियाला युक्रेनमध्ये आपलं सैन्य राखून ठेवताना फार संघर्ष करावा लागत आहे. अशा स्थितीत आपल्याला मदत मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. ज्या देशावर संयुक्त राष्ट्राने निर्बंध घातले आहेत त्या देशासह रशिया जाहीरपणे हातमिळवणी करत आहे. त्यामुळे रशिया आणि उत्तर कोरियामधील सैन्य सहकार्य ही चिंतेची बाब आहे. 


दरम्यान किम जोंग उन यांनी रशियाला युक्रेनविरोधातील युद्धात विनाअट जाहीर पाठिंबा असल्यचं जाहीर केलं आहे. ‘साम्राज्यवाद्यांविरोधातील’ आघाडीवर आपण नेहमीच रशियाच्या बरोबर असू असा दावा त्यांनी केला. रशिया आपले सार्वभौमत्वाचे अधिकार, सुरक्षा आणि हितसंबंध यांचे संरक्षण करण्यासाठी वर्चस्ववादी शक्तींविरोधात हे युद्ध लढत असल्याचे ते म्हणाले.


किम रशियाच्या मार्गावर असतानाच उत्तर कोरियाने दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण केलं. या माध्यमातून त्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. दरम्यान किम देशात उपस्थित नसताना उत्तर कोरियाने प्रथमच क्षेपणास्त्र चाचणी घेतली.